रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): समुद्रातील खराब वातावरण, वारा, पावसाच्या अधूनमधून बरसणाऱ्या सरी त्यामुळे मासेमारी सध्या ठप्प झालेली आहे. त्यामुळे मच्छिमार सध्या चिंतातूर आहेत.
दोन महिन्यांच्या बंदी नंतर १ ऑगस्टपासून पारंपारीक मासेमारीला सुरुवात झाली होती. तर पर्ससीन मासेमारी १ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. मात्र मच्छिमारांच्या मागचं शुक्लकाष्ट काही संपताना दिसत नाही. मोठ्या आशेने मच्छिमार आपल्या नौका घेऊन समुद्रावर स्वार झाले होते. मात्र सुरुवातीच्या काही दिवसांचा अपवाद वगळता सध्या मासेमारी ठप्प आहे. त्याचं मुख्य कारण आहे समुद्रातील वारा, त्यात जोडीला पाऊस आहेच. मात्र या वाऱ्यामुळे मच्छिमारांना आपल्या नौका समुद्रात नेणं शक्य होत नाही.. त्यामुळे जिल्ह्यातील जवळ्पास साडेचार हजार फिशिंग ट्रॉलर किनाऱ्यावर उभे आहेत. पारंपरिक मासेमारी सुरु होऊन २० दिवस उलटले आहेत, मात्र एखाद दोन नौकांचा अपवाद वगळता अनेकांनी आपल्या नौका किनाऱ्यावरच ठेवणं पसंत केलं आहे. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून मासेमारी ठप्प आहे, त्यामुळे आता करायचं तरी काय असा प्रश्न मच्छिमारांसमोर उभा आहे.