रत्नागिरी, (आरकेजी) : कोकण किनारपट्टीवर मच्छीमार बांधवांची लगबग दिसून येत आहे. मच्छीमारी बंदी कालावधी आज संपली आहे. त्यामुळे मच्छीमार बांधव उद्यापासून(मंगळवार) मच्छीमारी करण्यास सज्ज झाले आहेत. दोन महिन्याच्या बंदीच्या कालावधीत नौकांची डागडुजी पूर्ण झाली आहे. नौका किनार्यावर आणल्या गेल्या आहेत.
दरवर्षी राज्यात १५ ऑगस्ट किंवा नारळी पौर्णिमा यापैकी जो दिवस अगोदर येईल, त्या दिवशी मच्छीमारी बंदी उठवली जात होती. इतर राज्यातील बंदी मात्र १ ऑगस्टला उठवली जायची. या कालावधीत बाहेरचे मच्छिमार येऊन येथे माछिमारी करून जायचे त्यामुळे इथल्या मच्छिमारांचे नुकसान होत होते. गेल्या वर्षीपासून देशभरातील सर्वच किनारपट्टी भागातील बंदी कालावधीमध्ये सुसूत्रता आणण्यायासाठी प्रशासनाकडून १ जून ते ३१ जुलै असा बंदी कालावधी ठरवण्यात आला आहे. त्यामुळे घुसखोरीला आळा बसत आहे. यावर्षी निसर्ग साथ देईल आणि हंगाम चांगला जाईल, असे अपेक्षा मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.