
मुंबई , 12 मे : महाराष्ट्रातील मच्छिमारांना ‘कोरोना’ आपत्तीत फार मोठा दिलासा मिळाला आहे. डिझेलवरील परताव्याच्या रक्कमेस वित्तविभागाने परवानगी दिली असून येत्या काही दिवसांत थेट लाभार्थी हस्तांतरणाद्वारे (डी.बी.टी) ही रक्कम मच्छिमारांंच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
अस्लम शेख म्हणाले की, डिझेलवरील परताव्यासाठी तरतुद करण्यात आलेल्या 110 कोटींच्या निधीपैकी फेब्रुवारी 2020 अखेरपर्यंत ७८ कोटी डिझेल परताव्याचा निधी वितरीत करण्यात आला होता. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीच्या उर्वरीत 32 कोटींपैकी 19.35 कोटी निधी उद्भवलेल्या ‘कोरोना’ आपत्तीमुळे शासनाच्या प्राधान्यक्रम देयकानुसार रोक लावल्याने 31 मार्च 2020 रोजी हा निधी परत गेला होता.
कोरोनाच्या आपत्तीकाळात मच्छिमार बांधवांना दिलासा मिळावा यासाठी हा निधी परत आणण्याच्यादृष्टीने अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात येत होता. डिझेल परतावा वाटपास अर्थविभागाची परवानगी मिळाली असून त्यासंबंधिचे निर्देश संबंधित विभागास देण्यात आलेले आहेत. मुंबई शहर व उपनगरासाठीचा 12 कोटी 65 लाख रुपयांचा निधीचे धनादेशही सहा.आयुक्तांकडे जमा झालेले आहेत.असही अस्लम शेख यांनी सांगितलं.