रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील सोलगाव येथील ओहोळावर मासे पकडण्यासाठी गेलेले दोघेजण वाहून गेल्याची घटना घडली आहे. चंद्रकांत सखाराम गुरव (42) आणि तानाजी लक्षण शेळके (40) अशी या दोघांची नावं आहेत.
मंगळवारी रात्री उशिरा चंद्रकांत गुरव आणि तानाजी शेळके मासे पकडण्यासाठी सोलगावतील ओहोळावर गेले होते. मात्र पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने हे दोघेही वाहून गेल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. दरम्यान उशिरा रात्रीपर्यंत हे दोघेही घरी न आल्याने शोधाशोध सुरु झाली. त्यानंतर रात्री उशिरा राजापूर पोलिसांना कळवण्यात आलं. राजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यातील तानाजी शेळके याचा मृतदेह सापडला असून, ग्रामस्थांच्या मदतीने चंद्रकांत गुरव यांचा शोध सुरू आहे..