रत्नागिरी (प्रतिनिधी): सलग सुट्ट्यांमुळे सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे कोकण सध्या पर्यटकांच्या गर्दीने फुल्ल झाले आहेत. कोकणच्या सौंदर्यानं पर्यटकांना नेहमीच भुरळ घातली आहे, मात्र आता इथल्या मासळीने देखील पर्यटकांना आकर्षित केलं आहे. अनेकांना मासे खरेदी करण्याचा मोह आवरला नाही, दापोलीत हर्णे समुद्रकिनारी आलेल्या पर्यटकांनी थेट मासे लिलावात भाग घेत वेगवेगळ्या प्रकारचे मासे मनसोक्तपणे खरेदी केले.
दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात दररोज करोडो रुपयांच्या मच्छिची उलाढाल होत असते. परदेशातही इथून मच्छि निर्यात केली जाते. म्हाकूळ, पापलेट, सुरमई, हलवा, कोळंबी अशी वेगवेगळ्या प्रकारची मच्छि इथे मिळत असते. त्यामुळेच हर्णे बंदरात दाखल झालेल्या पर्यटकांनाहि मासे खरेदीचा मोह आवरता आलेला नाही. हर्णे बंदरात लिलाव पद्धतीने मासे विक्री होते. इथली लिलाव पद्धत ही वेगळी असल्यानं ती पाहण्यासाठी देखील इथं मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. सध्या सलग सुट्ट्यांमुळे हर्णे समुद्रकिनारा हा पर्यटकांनी फुलून गेला आहे. सुट्टीचा मनमुराद आनंद घेतल्यानंतर पर्यटकांनी थेट मासेखरेदी लिलावात भाग घेत मच्छि खरेदी केली. जी पाहिजे ती मच्छि पर्यटकांना इथं मिळाली, स्वस्तही नाही आणि जास्त महागही नाही अशी प्रतिक्रिया मच्छि खरेदी केल्यानंतर पर्यटकांची होती.