मदुराई : मरियम ढवळे यांची ६ एप्रिल २०२५ रोजी तामिळनाडूमधील मदुराई येथे झालेल्या २४व्या पक्ष महाधिवेशनामध्ये प्रथमच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोवर निवड झाली. त्या २०१८ पासून पक्षाच्या केंद्रीय समितीच्या सदस्या आहेत. त्यांच्या निवडीमुळे डाव्या पुरोगामी आणि महिला चळवळीला बळकटी मिळाली आहे. लढाऊ आणि अभ्यासू नेत्या म्हणून त्या परिचित आहेत.
विद्यार्थी चळवळ
मरियम यांचा जन्म ४ एप्रिल १९६१ रोजी मुंबईत झाला. त्यांनी इतिहास विषयात मुंबई विद्यापीठातून एम.ए. केले. १९७९ मध्ये वयाच्या १८व्या वर्षी त्या स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) मध्ये सामील झाल्या. १९८१-८२ मध्ये विल्सन कॉलेजच्या स्टुडंट कौन्सिलमध्ये त्यांची निवड झाली.
त्या १९८३ ते १९८८ पर्यंत SFI च्या मुंबई जिल्हा सचिव, आणि १९८८ ते १९९४ पर्यंत SFI च्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस होत्या. त्या SFI च्या देशातील पहिल्या महिला राज्य सरचिटणीस होत्या. १९८९ ते १९९७ या काळात त्यांची SFI च्या अखिल भारतीय उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी मुंबई-महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी संघर्ष आणि रॅलींचे नेतृत्व केले.
महिला चळवळ
महिला चळवळीच्या दिग्गज नेत्या आणि माजी खासदार अहिल्या रांगणेकर यांच्या प्रेरणेने आणि तत्कालीन AIDWA सरचिटणीस आणि माजी खासदार वृंदा कारत यांच्या मार्गदर्शनाखाली १९९४ मध्ये त्या ऑल इंडिया डेमोक्रॅटिक विमेन्स असोसिएशन (AIDWA) मध्ये सामील झाल्या.
दिग्गज AIKS नेत्या गोदावरी परुळेकर यांच्या प्रेरणेने १९९४ ते २००४ पर्यंत AIDWA च्या ठाणे-पालघर जिल्हा सचिवपदी त्यांची निवड झाली. त्यांनी येथे प्रामुख्याने आदिवासी महिलांमध्ये काम केले.
१९९४ ते १९९७ पर्यंत त्या AIDWA च्या महाराष्ट्र राज्य सहसचिव, १९९७ ते २००४ पर्यंत राज्य कार्याध्यक्ष, २००४ ते २०१० पर्यंत राज्य सरचिटणीस, आणि २०१३ ते २०१७ पर्यंत राज्य अध्यक्ष होत्या.
२०१६ मध्ये, AIDWA च्या अखिल भारतीय सरचिटणीस म्हणून त्यांची निवड झाली. दोनदा फेरनिवड होऊन त्या अजूनही ती जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी अनुभवी नेत्या आणि माजी खासदार मालिनी भट्टाचार्य आणि केरळच्या माजी आरोग्य मंत्री व माजी खासदार पी. के. श्रीमती या दोन अध्यक्षांसोबत सोबत काम केले आहे. त्यांनी गेल्या तीन दशकांमध्ये महिलांच्या अनेक प्रश्नांवर संघर्षांचे नेतृत्व केले आहे.
महिलांच्या समस्या आणि सामाजिक-राजकीय प्रश्नांवर त्या विविध राष्ट्रीय नियकालिकांसाठी नियमितपणे लिहितात. त्या AIDWA चे केंद्रीय मुखपत्र ‘इक्वालिटी’ च्या संपादक आहेत.