मुंबई : मालाड-मार्वे येथे सुरु होणाऱ्या रो-रो जेट्टीमुळे येथील कोळी बांधवांना आणि स्थानिक रहिवाश्यांना याचा फायदा होईल. तसेच मार्वे-गोराई किनाऱ्याच्या संथ पाण्यामध्ये केरळच्या धर्तीवर बॅक-वॉटर टूरिझम सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, जेणेकरून मुंबईकरांना खुद्द मुंबईकर पर्यटनाची उत्तम संधी मिळू शकेल, असा विश्वास शिक्षणमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे व्यक्त केला.
मालाड-मार्वे येथील रो-रो जेट्टीच्या बांधकामाचे भूमिपूजन तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते.
तावडे म्हणाले, मनोरी-गोराई-मार्वे या किनाऱ्यावर भरपूर गाळ आहे. यामध्ये ड्रेझिंग केल्यास हे किनारे गाळमुक्त होतील, याचा फायदा येथील रहिवाश्यांना होईल. मार्वे येथे गेले अनेक वर्षापासून जेट्टी उपलब्ध नव्हती. मार्वेवासियांना मनोरी गावात जाण्यासाठी पाण्यातून आणि वाळूतून वाट काढत व त्रास सहन करत बोट पकडावी लागत असे. परंतू शासनाने अग्रक्रमाने रो-रो-जेट्टीचा प्रकल्प प्रत्यक्षात आणला आणि आज त्याचे भूमिपूजन झाले. यामुळे मनोरी आणि मार्वेवासियांना लवकरच जेट्टीची सुविधा मिळणार आहे.
मार्वे-मनोरी-गोराई या किनाऱ्याजवळची कांदळवने अशीच पडून आहेत, या कांदळवनाच्या परिसरात 233 प्रकारचे पक्षी आहेत. शिवाय विविध प्रकारचे प्राणीही असल्याचे आढळून आले आहे. हे प्रत्यक्षात पाहण्यासाठी याठिकाणी पर्यटन केंद्र बनविण्याचा शासनाचा मानस आहे, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.
केरळच्या धर्तीवर या परिसरात पर्यटन केंद्र सुरू झाल्यास येथील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. पर्यायाने पर्यटनाचा ओघही वाढेल, असा विश्वासही तावडे यांनी व्यक्त केला