
मुंबई : नवी मुंबई सानपाडा येथील पत्रकार व वृत्तपत्र लेखक मारुती विश्वासराव यांना ” उत्कृष्ट वृत्तपत्र लेखक पुरस्कार २०२५ ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य या राज्यस्तरीय संस्थेचा २४ वा वर्धापन दिन पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रलेखकांचे राज्यस्तरीय संम्मेलन ६ जानेवारी २०२५ रोजी दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, सुरेंद्र गावस्कर सभागृह येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मभूषण माजी राज्यपाल व केंद्रीय रेल्वेमंत्री माननीय श्री. राम नाईक हे होते. या निमित्ताने राज्यातील पत्रकार, पत्रलेखक, कृषी, उद्योग, शिक्षण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी दैनिक लोकमतचे माजी संपादक व ज्येष्ठ पत्रकार श्री. मधुकर भावे, दै. प्रहारचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर, पुढारी चॅनलचे विशेष कार्यकारी संपादक श्री. तुळशीदास भोईटे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पत्रकारिता, पत्रलेखन, शिक्षण, कृषी, उद्योग, क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी राज्यातील विविध भागातील मान्यवरांना विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पत्रकार क्षेत्रातील आव्हाने व त्याचा सामना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत उपस्थिताना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. राम नाईक यांनी आपल्या जीवनातील साहित्य क्षेत्रातील अनेक अनुभव कथन करीत स्थानिक राजकारण ते केंद्रीय मंत्री व राज्यपाल पदापर्यंत प्रवास उलगडला. याप्रसंगी आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना २१३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन सुबोध जाधव यांनी केले तर आभार संघाचे संचालक संतोष धोत्रे यांनी मानले.















