रत्नागिरी (आरकेजी): हर हर मार्लेश्वर, शिवहराच्या जयघोषाात महाशिवरात्रीदिनी मंगळवारी राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या स्वयंभू मार्लेश्वर देवाचे हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. तर दुसरीकडे संगमेश्वर तालुक्यातील भगवान शंकराची मंदिरेदेखील शिवभक्तांच्या गर्दीने फुलून गेली होती.
देवरूख शहरापासून सुमारे १८ किमी अंतरावर स्वयंभू श्री देव मार्लेश्वर देवस्थान वसले आहे. हे देवस्थान भगवान शंकराचे असल्यामुळे मार्लेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करीत असतात. तर मंगळवारी महाशिवरात्री असल्याने या दिनाचे औचित्य साधून शिवभक्तांनी मार्लेश्वराच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने तीर्थक्षेत्री गर्दी केली होती. यावेळी दिवसभरात हजारो शिवभक्तांनी हर हर महादेवाच्या जयघोषात मार्लेश्वराचे दर्शन घेतले. शिवभक्तांच्या जयघोषाने मार्लेश्वर मंदिराचा परिसर अक्षरश: दणाणून गेला. दुसरीकडे तालुक्यातील कसबा येथील कर्णेश्वर, आंगवली येथील मार्लेश्वर मठ, पाटगावमधील सांब मंदिर, मठधामापुरातील सोमेश्वर मंदिर, टिकलेश्वर आदिंसह विविध महादेवाची मंदिरे शिवभक्तांनी गजबजून गेली होती. या शिवमंदिरांमध्ये शिवभक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. शिवभक्तांनी यावेळी भोलेनाथाचे दर्शन घेतले. दिवसभर तालुक्यातील शिवमंदिरांमध्ये हर हर महादेवाचा गजर सुरू होता. तर शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण होते. एकंदरीत मंगळवारी महाशिवरात्रदिन तालुक्यातील असंख्य शिवभक्तांनी भगवान शंकराचे दर्शन घेऊन मोठ्या उत्साहात साजरा केला.