रत्नागिरी : आंबा बागेत दारू पिऊ नका अन्यथा मी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करीन असे सांगितल्याच्या रागातुन तरूणाला लोखंडी फाईट आणि लाकडी बांबुने मारहाण केली. या प्रकरणी सहा जणांविरोधात शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आसिम पावसकर, सलमान पावसकर, अशपान गडकरी, सकावत पावसकर, मोहसीन पावसकर, सैफअली पावसकर (सर्व रा. शिवखोल राजीवडा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात सनाउल्ला बशीर गडकरी (३१, रा. शिवखोल राजीवडा) यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. गडकरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शनिवार २१ एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सनाउल्ला यांच्या घरासमोरील बागेमध्ये काम करीत बसले होते. यावेळी त्यांना बागेत सहाजण दारू प्यायला बसलेले दिसून आले. त्यांना पाहताच सनाउल्ला गडकरी यांनी तुम्ही माझ्या बागेत दारू पिऊ नका नाहीतर मी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करेन असे सांगितले. या रागातुन सहाजणांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. यानंतर सलमान पावसकर याने लोखंडी फाईटने सनाउल्ला यांच्या डोक्यावर प्रहार केला. तर अशपान गडकरी याने बिअरची बाटली त्यांच्या उजव्या हातावर मारली. यानंतर सहाजणांनी बाजुला पडलेल्या बांबुने सनाउल्लाह यांना मारहाण केली. या मारहाणीत सनाउल्लाह गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.