रत्नागिरी,(आरकेजी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज संगमेश्वर तालुका बंदची हाक देण्यात आली होती. तालुक्यात बंद 100 टक्के यशस्वी झाला. संगमेश्वर, देवरूखसह साखरपा परिसरात सर्वच ठिकाणी बंद यशस्वी करण्यात आला. तर देवरुखमध्ये मराठा समाजाच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले. रिक्षा आणि एस.टी. सेवाही संध्याकाळपर्यंत बंद राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले.
सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. या मुद्द्यावर बंद आणि मोर्चा सुरू आहे. दरम्यान मराठा क्रांती मोर्चाला पाठींबा देण्यासाठी संगमेश्वर तालुक्यात क्षत्रिय मराठा समाज संघटनेच्या वतीने आज तालुका बंदची हाक दिली होती. त्यामुळे आज देवरूख, साखरपा, संगमेश्वर या तिनही ठिकाणी व्यापार्यांनी 100 टक्के बंद पाळत मराठा बांधवांना आपला पाठींबा दर्शवला. तालुक्यातील माखजन, आरवली, कसबा, फणसवणे, कोसुंब, साडवली, सह्याद्रीनगरसह अन्य ग्रामीण भागातही बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या.
आजच्या बंदला देवरूख आणि संगमेश्वरातील रिक्षा संघटनांनीही पाठींबा दिला, त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तर सकाळी सुरु असलेली एसटी सेवा त्यानंतर बंद होती. देवरूख आगाराने संगमेश्वर, साखरपा, माखजन बसस्थानकावरील वाहतूक बंद केली. सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळात याठिकाणाहून एकही बसफेरी सुटली नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले. बंदच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.