रत्नागिरी, प्रतिनिधी : जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकारच्या विरोधात आंदोलन आणि रण पटविण्याचं काम आम्ही करू, आणि नुसतं आंदोलन करणार नाही तर वेळप्रसंगी याहीपेक्षा जास्त पाऊल उचलायला लागलं तर आम्ही उचलू, आणि त्याला जिम्मेदार हे सरकार असेल असा इशारा भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी दिला आहे. ते आज खेडमध्ये मराठा नेत्यांशी संवाद साधल्यावर माध्यमांशी बोलत होते.
सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. दरम्यान मराठा समाजातील नेत्यांशी चर्चा करुन मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी आणि भाजपची भूमिका स्पष्ट करण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यात दाैरा सुरु आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी आज खेड येथील छत्रपती मराठा भवन येथे तालुक्यातील मराठा नेत्यांशी चर्चा केली आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
यावेळी प्रसाद लाड म्हणाले की, आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे, ते आरक्षण कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मिळावं यासाठी भाजपने समिती गठीत केली आहे. या समितीच्या माध्यमातून जिल्हा दौरे सुरू आहेत. या आरक्षणासाठी भाजप संघर्ष करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण हे मिळालच पाहिजे. आरक्षणासाठी जर आंदोलन करावं लागलं, संघर्ष करावा लागला तर भाजप क्रांती मोर्चाच्या मागे खंबीरपणे उभी राहिल असं प्रसाद लाड यांनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सरकारच्या विरोधात आंदोलन आणि रण पटविण्याचं काम आम्ही करू, आणि नुसतं आंदोलन करणार नाही तर वेळप्रसंगी याहीपेक्षा जास्त पाऊल उचलायला लागलं तर आम्ही उचलू, आणि त्याला जिम्मेदार हे सरकार असेल असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला आहे..