विक्रोळी कन्नमवार नगर येथील सजावटकार दर्शना गोवेकर-गायकवाड यांची पर्यावरणपूरक सजावट
कोकणवृत्तसेवा विशेष : मराठी शाळा टिकू दे…पुन्हा एकदा विद्यार्थी पट वाढू दे.. सजावट करून बाप्पाला साकडे घातले आहे. विक्रोळी कन्नमवार नगर येथील सजावटकार दर्शना गोवेकर-गायकवाड आणि सहकाऱ्यांनी हा घरगुती गणेशोत्सव देखावा साकारला आहे.
दहा दिवस अथक मेहनतीनंतर हा देखावा तयार झाला. यात शाळा, विद्यार्थी, गुरुजी, फळा, पट्टी, पेन्सिल आणि विविध संदेश दाखवण्यात आले आहेत. विद्यार्थी प्रतिकृती शाडू मातीचे बनवण्यात आले आहेत. शाळेचे पटांगण, खोखो खेळणारे विद्यार्थी, लेझिम प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. शाळेचे मैदान आणि त्यावर गवत दाखविण्यात आले आहे. बंद शाळा, घटती विद्यार्थी यावर भाष्य करण्यात आले आहे.
पालकांनी मराठी शाळांकडे पाठ फिरवली आहे. असेच सुरू राहिल्यास मराठी शाळा एक ना एक दिवस संपूर्णपणे बंद होतील. याच विषयावर भाष्य करणारा घरगुती गणेशोत्सव देखावा दर्शना यांनी साकारला आहे. मराठी शाळांना पुन्हा चांगले दिवस यावे यासाठी आता थेट गणरायाकडेच साकडे घालण्यात आले आहे.
दर्शना यांना सदर देखावा साकारण्यासाठी मानसी गोवेकर, प्रसाद पेडणेकर, सिद्धेश शिंदे, अनिरुद्ध साळवे, नताशा पांगे, निकिता पांगे यांची मदत झाली.
सदर देखाव्यात 20 वर्षांपूर्वी मराठी शाळेतील चांगले दिवस आणि वर्तमान काळातील विद्यार्थी संख्या मांडण्यात आली आहे. हा देखावा साकारण्यासाठी पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. मराठी शाळा टिकल्या तर मुंबईत मराठी टिकेल असा संदेशही देण्यात आला आहे.
मी मराठी शाळेतच शिकली. तंत्रज्ञानाच्या युगात इंग्लिश भाषा गरजेची आहे. आम्ही उत्तम इंग्लिश भाषा शिकवू शकतो अशी शाश्वती मिळाल्यास पालक मराठी शाळेकडे पुन्हा वळू शकतात असे सजावटकार दर्शना गोवेकर- गायकवाड यांनी सांगितलं आहे.