मुंबई, (एस.एल.गुडेकर ) : रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद डाेंबिवली शाखेने सु. श्री. इनामदार, भालचंद्र कोल्हटकर, सुरेश सरदेसाई , रमेश भिडे , विवेक जोशी आणि डॉ. संजय रणदिवे या सहा ज्येष्ठ रंगकर्मीचा तसेच रंगभूमीसंबंधी समस्याना वाचा फोडणाऱ्या पत्रकार शंकर जाधव यांचा सत्कार केला. अभिनेता नंदू गाडगीळ , नाटककार प्रवीण शांताराम, आनंद म्हसवेकर, माधव जोशी, मदन जोशी, सुरेश देशपांडे, महापौर राजेंद्र देवळेकर आणि सभागृह नेते राजेश मोरे यांच्या हस्ते सत्कार समारंभ झाला. महापौर देवळेकर यानी शहरातील नाट्यकर्मींच्या समस्या सोडविण्याची हमी दिली.
दिलीप गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली साडेचार तासांचा हा विशेष कार्यक्रम झाला. दुर्गराज जोशी आणि स्वप्ना कुंभार देशपांडे यांनी निवेदन केले. नृत्यम या संस्थेतर्फे नृत्यकलाकारांची नृत्ये सादर झाली.
प्रा. डॉ प्रसाद भिड़े तसेच त्यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते रमेश भिडे यांनी वि. वा. शिरवाडकर- कवी मनाचा नाटककार हा कार्यक्रम सादर केला. विनोदी विडंबनात्मक संस्कृत नाट्य कदौघ सह ( संदर्भ-कट्यार काळजात घुसली ) लेखक दिग्दर्शक सादरकर्ते युवराज ताम्हणकर आणि सहकारी यानी सादर केले. दिलीप गुजर, निशिकांत रानडे, केतन दुर्वे, भारती ताम्हणकर, अनुजा रानडे, दुर्गाराज जाेशी, राहुल कामत, विवेक ताम्हणकर, बापू राऊत, शुभदा गाेडसे, सुवर्णा केळकर आदींच्या सहकार्यातूनच यशस्वीरित्या पार पडला.