मुंबई : विक्रोळी येथील विकास, कला व विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा दिना निमित्त “साहित्य संध्या” या कार्यक्रमाचे आयोजन मराठी वांङमय मंडळाच्या वतीने २७ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी ८ वाजता करण्यात आले. कार्यक्रमात सुरुवातीस पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेले व सुरेश भट लिखित “लाभले आम्हास भाग्य” या गीताने कार्यक्रमात रंगत भरली. कु. अक्षदा साळवी या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनीने पु.ल.देशपांडे लिखित ती फुलराणी या नाटकातील “तुला शिकवीन चांगलाच धडा” व “ वेडे खरे दीड शहाणे” या महिलांवर होणाऱ्या अन्यायावर आधरित असणाऱ्या नाटकातील नाट्यांश सादर केला व प्रेक्षकांची दाद मिळविली.
द्वितीय वर्ष विज्ञान शाखेतील राहुल वेलकर याने नटसम्राट या अजरामर नाटकातील गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर यांच्या भूमिकेतील ”कुणी घर देताका घर …” हा नाट्यांश सादर केला. तसेच काव्य-वाचन, कथाकथन, चित्रपट गीते, भक्तिगीते इ. साहित्य प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. प्रा. नयन म्हात्रे “मराठी भाषा आणि शासकीय उदासीनता” मराठी भाषा संवर्धनासाठी युवा पिढीनेच पुढाकार घ्यावा असे नमूद केले. तसेच प्रा. संभाजी खांडेकर यांनीजागतिकीकरणाच्या प्रवाहामध्ये मराठी भाषेचे अस्तित्व या विषयावर आपले मत व्यक्त केले.
संस्थेचे चिटणीस डॉ. विनय प. राऊत यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. पात्रा, उपप्राचार्य व्ही.व्ही. मुळे व शाजी मॅथ्यू, ग्रंथपाल उदय कुलकर्णी व समस्त प्राध्यापकवृंद व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य कदम व प्रांजली चेंदवणकर यांनी केले व आभारप्रदर्शन मराठी वांङमय मंडळाचे अध्यक्ष प्रा. अनंत नितुरे यांनी केले.
महाविद्यालय ग्रंथालयात मराठी साहित्य संपदा हे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले. पु.ल. देशपांडे, सुधीर फडके व ग. दि. माडगुळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांची ग्रंथसंपदा ग्रंथालयात प्रदर्शित करण्यात आली. त्याचप्रमाणे हवी-हवीशी हाक या भित्तीपत्रकाच्या विशेषांकात कुसुमाग्रज पु..ल. देशपांडे, सुधीर फडके व ग. दि. माडगुळकर या तीन महान विभूतींचा जीवनप्रवास उद्घृत करण्यात आला. मराठी भाषेमध्ये संगणकावर टंकलिखित करता यावे म्हणून “युनिकोड” कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले.