मुंबई : राज्य सरकारतर्फे मुंबईत उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनाला आता गती देण्यात आली असून दक्षिण मुंबई परिसरातील महत्त्वाच्या भागात या भवनाच्या प्रशासकीय कार्यालयांची उभारणी करण्याबाबत मराठी भाषा विभागाच्या मंत्री स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आले. कार्यक्रमांसह इतर अनुषंगिक वापरासाठी नवी मुंबईतील ऐरोली येथे उपकेंद्र उभारण्यासही आज मंजुरी देण्यात आली.
दक्षिण मुंबईतील धोबी तलाव परिसरात रंगभवन येथे मराठी भाषा संशोधन, विकास व सांस्कृतिक केंद्राची (मराठी भाषा भवन) उभारणी करण्यात येणार होती. मात्र, रंगभवनची वास्तू हेरिटेज यादीत समाविष्ट असल्याने या जागेवर भाषा भवन उभारण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय रद्द रण्यात आला आहे. चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जे.जे. स्कुल ऑफ आर्ट, फोर्ट किंवा वांद्रे-कुर्ला वसाहत परिसरात भाषा भवनाची वास्तू उभारण्याबाबत मराठी भाषा विभागाच्या स्तरावर निर्णय घेण्याचे आज ठरविण्यात आले. यासोबतच विविध कार्यक्रम-उपक्रमांच्या आयोजनासह निवासी-संशोधनात्मक वापरासाठी नवी मुंबईतील ऐरोली येथे उपकेंद्राची इमारत उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला.