मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी रोजी असणारा जन्मदिन हा राज्यात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कामकाजात मराठीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन मराठी भाषा विभागाने केले आहे. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व मंत्रालयीन विभाग आणि त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालय प्रमुखांनी विविध उपक्रम करुन हा दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी भाषा गौरव दिन साजरा करीत असताना वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यात यावे जसे मोबाईलवर मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. ‘बोलू तसे टंकलेखन’,’स्पीच टू टेक्सट लिपीकार’ या मुक्त ॲपच्या माध्यमातून मोबाईलवर मराठीतून टंकलेखन आणि स्वरचक्र या फक्त टंकलेखनासाठी उपयुक्त असणाऱ्या मुक्त ॲपच्या माध्यमातून मराठीतून मोबाईलवर टंकलेखन करावे. लिपीकारसारखे मराठी व्हॉईस टायपिंग की बोर्ड,स्पीच नोटस, हीअर टू रीड मराठी, व्हॉईस टू टेक्स्ट मराठी की बोर्ड ॲप्सचे अनेक पर्याय टंकलेखन करण्यासाठी उपलब्ध आहेत. त्याचा वापर सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी करावा. स्वरचक्राप्रमाणे स्पर्श, पाणिनी,गुगल इंडिका अशा ॲप्सचे अनेक पर्याय मराठी टंकलेखनासाठी उपलब्ध असून त्याचाही वापर करण्यात यावा. राज्य शासनाच्या संकेतस्थळावरील मुख्य पानावरील चलतचित्र पाहावे. त्यानुसार संगणकावर युनिकोड मराठी कार्यान्वित करण्याची कृती करावी असे मराठी भाषा विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
मराठी भाषा गौरव दिनाचा भाग म्हणूनच 27 फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयात एकाच वेळी लाभले आम्हास भाग्य या मराठी अभिमान गीत गायले जाईल. सकाळच्या सत्रात सकाळी 11 वाजता आणि दुपारच्या सत्रात दुपारी 4 वाजता मराठी अभिमान गीत गायले जाईल. मातृभाषेची महती आणि माहिती, तसेच मातृभाषेचे व्यक्तिगत आणि समाज जीवनातील स्थान आणि मातृभाषेचे मानसशास्त्रीय आणि शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने महत्व या विषयावर विचारमंथनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय सकस साहित्य,नवी माहिती, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान मराठीतील पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने राज्यभर ग्रंथप्रदर्शन/ ग्रंथोत्सव /ग्रंथदिंडी आयोजित करण्यात येतील. शाळा, महावदियालय, शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, खासगी संस्थांमध्ये विविध स्तरावर मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीविषयक विविध स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे. न्यायव्यवहार, शासन प्रशासन, प्रसार माध्यमे, केंद्र आणि राज्य शासनाची कार्यालये, इतर अशासकीय कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर याबाबत व्याख्याने, चर्चासत्रे,परिसंवाद आणि कार्यशाळा याचे आयोजन करण्यात यावे. याबरोबरच प्रसारमाध्यमे तसेच प्रशासनात मराठी भाषेचा वापर याबाबत वेगवेगळे उपक्रम आयोजित करणे,युनिकोड प्रणित मराठी अणि इन्स्क्रीप्ट मराठी कळफलक संबंधित विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करणे, समाजमाध्यमांतील माहिती व तंत्रज्ञान आणि मराठी,महाजालावरील मराठी या क्षेत्रातील तज्ञांची व्याख्याने आयोजित करणे, मोडी लिपीचे प्रशिक्षण, व्याख्यान आणि परिसंवाद, अशा विविध उपक्रमाचे आयोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्याwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेताक 201802031527331933 असा आहे.