मुंबई: विक्रोळी येथील विद्या विकास एज्युकेशन सोसायटीच्या विकास कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळा द्वारे मराठी भाषा दिना निमित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी …” या सुरेश भटांच्या कवितेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात “मराठी साहित्य संपदा” या भव्य ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उदघाटन लोकमतचे न्यूज18 चे कार्यकारी निर्माता व वृत्तनिवेदक विशाल परदेशी यांच्या हस्ते झाले. या समारंभाला महाविद्यालय विकास समितीचे व्ही. आर. जनावडे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. पात्रा, प्रा. विकास राऊत उपस्थित होते. वृत्तनिवेदक विशाल परदेशी यांनी “मराठी टीव्ही वाहिन्यांमध्ये मराठी व्याकरणाचा उपयोग” या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी मराठी काव्यवाचन, कथाकथन असे विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केले. “जगतिकीकरणामध्ये मराठी भाषेचे अस्तित्व” या विषयावर सोमैय्या महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. विना सानेकर यांचे व्याख्यान झाले. त्यांनी आपल्या भाषणात आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक भाषा धोक्यात आल्या आहे. आईशी जशी बाळाची नाळ जडलेली असते तशीच आपली नाळ मराठीशी जोडलेली आहे.मराठी बोलणं ही आपल्यासाठी अभिमानाची आणि भूषणावह बाब असायला हवी पण वास्तव अगदीच उलटं आहे. मराठी भाषेच्या शाळा असायलाच हव्यातच. वाङ्मयमंडळ ही प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात असायलाच हवीत. बोली टिकली पाहिजे कारण ती आपल्या भाषेचे सौन्दर्य आहे.मराठी रुजवण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे ते म्हणाले. प्रमुख पाहुणे प्रा. विकास राऊत यांनी सांगितले की आपण वाचाल तर वाचाल. सध्या लोप होत चाललेली वाचन संस्कृती जपण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. हा कार्यक्रम संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या प. राऊत यांच्या अध्यक्षते खाली पार पडला. पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्रा. विवेक कुरंभट्टी यांनी केले.संस्थेचे चिटणीस प्रा. विनय राऊत, महाविद्यालयाचे प्राचार्य आर. के. पात्रा, उपप्राचार्य प्रा. विनायक मुळे व विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन शुभदा देशपांडे यांनी केले तर प्रा. अनंत नितुरे यांनी आभारप्रदर्शन केले.