डोंबिवली : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी कल्याण-डोंबिवली शहरात उद्या (गुरुवार) मराठा समाजातर्फे केवळ धरणे आंदोलन होणार आहे. येथे कोणत्याही प्रकारचा बंद करणार नसल्याचे येथील मराठा क्रांती मोर्चातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
गुरुवारी, ९ ऑगस्ट क्रांती दिनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी कल्याण येथे मराठा क्रांती मोर्चाच्या तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी कल्याण, डोंबिवली, आंबिवली व टिटवाळा परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर बैठकीत बंद न करता कल्याण येथे तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंबिवली येथील कार्यकर्ते देखील या धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत. डोंबिवली येथील कार्यकर्ते तेथील इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करणार आहेत तर टिटवाळा येथे पोलीस ठाण्याजवळ धरणे धरण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना पोलिसांकडून 149 च्या नोटीसा देण्यात येत असल्याने यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. कल्याण-डोंबिवलीमध्ये गुरुवारी मराठा क्रांती मोर्चातर्फे केवळ धरणे आंदोलन करण्यात असून कोणत्याही प्रकारचा बंद करणार नसल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अॅड. धनंजय जोगदंड, अरविंद मोरे यांनी पत्रकारांना दिली आहे.