नवी दिल्ली : संपूर्ण महाराष्ट्रातून ९ ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या मागण्यासाठी मुंबईत मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येत आहे. राज्यातून लाखो लोक मोर्चात येणार असून, त्यासाठी कोल्हापूरसह महाराष्ट्रातून ९ ऑगस्ट रोजी होणा-या मराठा क्रांती मोर्चासाठी रेल्वेला जादा डबे जोडण्यात यावी, ही खासदार संभाजीराजे छत्रपती यांची मागणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तातडीने मंजूर केली. संभाजीराजे यांच्या या प्रयत्नाला यश मिळल्याने हजारो मराठा मोर्चेकरांना मुंबईत जाणे शक्य होणार आहे.
दिल्ली येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यालयात खासदार संभाजीराजे यांनी ९ ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणा-या मराठा क्रांती मोर्चा संदर्भात भेट घेतली. या प्रसंगी खा. संभाजीराजे यांनी मराठा क्रांती मोर्चाची सर्व माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना सांगितली. तसेच महाराष्ट्रातून लाखो लोक मोर्चास येणार असलेने वाहनांची सोय होणे अवघड असल्याने रेल्वेला अतिरिक्त डब्यांची सोय केली तर सर्व मराठा बांधव सुरक्षितपणे मोर्चास येऊ शकतील असेही सांगितले.
या मोर्चासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक सहभागी होणार आहेत. त्यांना मुंबईत रेल्वेने तातडीने पोहचण्यासाठी प्रत्येक गाडीला जादा डबे वाढवून देण्यासह परतीच्या प्रवासासाठीही मुंबईतून राज्याच्या काना-कोपऱ्यात परत जाण्यासाठी अतिरिक्त डबे रेल्वेला जोडण्यात येण्याची मागणी संभाजीराजे यांनी केली होती. मोर्चाचे महत्व लक्षात घेवून रेल्वेमंत्री प्रभु यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून ८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी मुंबईकडे जाणा-या व ९ ऑगस्ट रोजी सकाळपर्यत पोहचणा-या सर्व गाड्यांना जादा डबे जोडण्यात येतील. तसेच ९ ऑगस्ट रोजी मुंबईहून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात परत जाणा-या गाड्यांना अतिरिक्त डब्याची व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.