मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा कायदा वैध ठरल्याबाबत महामुंबई मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवन येथे भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. प्रतिनिधींनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
यावेळी महामुंबई मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार, शांताराम कुंजीर, अंकुश कदम, अमर पवार, अनिल ताडगे, पंकज घाग, हनुमंत मोटे, विनोद साबळे, प्रशांत सावंत, अॅड. अभिजित पाटील आदींनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधीमंडळात कायदा संमत करुन त्यानंतर त्याच्या समर्थनार्थ राज्य शासनामार्फत उच्च न्यायालयात अभ्यासपूर्ण आणि सक्षमपणे भूमिका मांडून कायदा यशस्वी केल्याबद्दल प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.