रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांसाठी यंदाही मांडवी पर्यटन महोत्सवाची पर्वणीचा आस्वाद घेता येणार आहे. 28, 29, 30 एप्रिल व 1 मे रोजी हा पर्यटन महोत्सवाला सुरुवात होणार असून मांडवी समुद्रकिनारी तो साजरा करण्यात येत असल्याची माहिती महोत्सवाचे अध्यक्ष रुपेंद्र शिवलकर तसेच राजीव कीर यांनी दिली आहे.
गेल्यावर्षी पहिल्यांदाच मांडवी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. पहिले वर्ष असूनही या महोत्सवाला अपेक्षेपेक्षा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान गेल्या वर्षी याच वेळी रत्नागिरी नगर परिषदेने सुद्धा रत्नागिरी पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यावेळी नगर प्रशासनाकडून पुढच्या वर्षी दोन्ही महोत्सव एकत्रित केले जातील असं सांगण्यात आलं होतं, मात्र यावर्षी त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही यावर्षीही मांडवी पर्यटन महोत्सव स्वतंत्रपणे घेत असल्याची माहिती मांडवी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर यांनी रत्नागिरी शहर, परिसर गोव्याप्रमाणे निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. मात्र तरी सुद्धा अनेक पर्यटक इकडे पाठ फिरवतात.. पर्यटकांची हि संख्या वाढावी त्याचप्रमाणे स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. 28 एप्रिल रोजी सायंकाळी मांडवी भैरी मंदिर ते मांडवी समुद्र किनारा शोभायात्रा निघणार आहे. सायंकाळी 6 वाजता वाळूशिल्प, खाद्य महोत्सवाचं उदघाटन होऊन या महोत्सवाला सुरुवात होणार आहे. तसेच संध्याकाळी 7 वाजता महेरवाशिणींचा मेळावा तसेच होम मिनिस्टर स्पर्धा होणार आहे. या महोत्सवाच्या उदघाटनाला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर येणार असल्याची माहिती यावेळी किर यांनी दिली. तसेच आमदार उदय सामंत, राजन साळवी, नगराध्यक्ष राहुल पंडित, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनाहि निमंत्रित केलं असल्याची माहिती कीर यांनी यावेळी दिली. 29 एप्रिल रोजी मराठी व हिंदी गीतांचा ऑर्केस्ट्रा, 30 एप्रिल रोजी फॅशन शो, स्थानिक लोककला आणि गाण्याचे कार्यक्रम तर 1 मे 2018 रोजी मराठी गीतांचा सदाबहार कार्यक्रम होणार आहे. दरम्यान पालकमंत्री रवींद्र वाईकर यांच्या उपस्थित या महोत्सवाचा समारोप होणार आहे.
महोत्सवात जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा
या महोत्सवात 29 एप्रिल रोजी रत्नागिरी जिल्हा जलतरण संघटनेतर्फे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा घेण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता दिपस्तंभ कुरणवाडा ते गेट वे ऑफ रत्नगिरी मांडवी अशी एक किलोमीटर लांबीची हि स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेच्या उद्धाटन समारंभाला आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रकाश नाडर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
महोत्सवात 36 स्टॉल्स
पर्यटन महोत्सवात पर्यटकांना खास कोकणी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. यामध्ये खेकडे, कोळंबी, कालवे, मटणवडे, कोंबडीवडे, भाकरी, बिर्याणी अशा मत्साहारी-मांसाहारी झणझणीत जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच जांभुळ, करवंद, तोरण, काजू आदी रानमेव्याचीही चव चाखता येणार आहे. पर्यटन महोत्सवात एकूण 36 स्टॉल्सची उभारणी करण्यात आली आहे.