मुंबई : आम्ही भ्रष्टाचार करतो, असा आरोप करताय, पण तो करण्याआधी तुमचे मंत्रीमंडळ भ्रष्टाचाराने किती बरबटलेले आहे ते आधी बघा, असे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले. मुंबईतल्या नालेसफाईत घोटाळा झाला, असा आरोप तुम्ही आमच्यावर केला आहे, मग तिथे नमामि गंगेचं थोतांड केले. प्रचंड पैसा खर्च केलात पण गंगेचा एक थेंबही स्वच्छ झाली नाही, मग हा पैसा काय मोदींच्या खिशात गेला का?असा प्रश्न ही त्यांनी भाजपाला विचारला. वांद्र-कुर्ला संकुलातील मैदानावर आज शिवसेनेची सभा झाली. त्यावेळी उद्धव यांनी शिवसैनिकांना संबोधीत केले. संपूर्ण मैदान शिवसैनिकांनी भरून गेले होते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधन झाल्यानंतर ‘उद्धवके साथ शिवसैनिक नही जाएंगे, शिवसेना को खत्म करो’, अशी भाषा भाजपामधील नेत्यांनी सुरू केली. यावर भाजपाच्या सातशे पिढ्या आल्यातरी शिवसेना तुमच्या छाताडावर उभी राहून झेंडा रोवेल, असे उद्धव यांनी म्हणताच टाळ्यांचा एकच कडकडाट मैदानावर झाला.
भाजपाने आज पुण्यात मुख्यमंत्र्यांची सभा घेतली. या सभेला गर्दीच जमली नाही. अत्यंत पारदर्शक अशी ही मुख्यमंत्र्यांची सभा होती. मुख्यमंत्र्यांनी सभेसाठी लोकांची वाट बघीतली आणि तेही नंतर पारदर्शक झाले, अशी खिल्ली उद्धव यांनी उडविली.
वीस वर्षांपूर्वीची मुंबई आणि आजची मुंबई बघा. अनेक कामे शिवसेनेकडून झाली आहे. संपूर्ण देशात मुंबई महापालिकेसारखे काम झालेले कुठेही पाहायला मिळणार नाही, याकडेही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. दुसरे आहेत जे महापौर बंगल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, मग युती करायला कशाला आला होता? असा प्रश्न त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारला.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :-
*शरद पवारांना पद्मविभूषण तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न का दिले गेले नाही ?
* लोकमान्य टिळकांचा ‘राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे’हा अग्रलेख एकदा वाचा
* स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या क्रांतीकारकांचं दालन मुंबईत बनवणार.
* भाजपाला आता ‘चल हट’ म्हणण्याची वेळ आली आहे
* सामनाने भाजपाला इतके बेजार केले आहे की सामनावर बंदी घालण्याची मागणी भाजपा करत आहे. ही तर आणीबाणी आहे
* ठाण्याचे महापालिका आयुक्त मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना फोन करतात. म्हणजेच त्यांची घसट आहे.
* शिवसेनेच्या प्रचारादरम्यान गर्भवती महिलेची मदत विक्रोळीतील महिला शिवसैनिकांनी केली. त्यांचे कौतुक.
* मुंबईकर तुम्हाला २३ तारखेला मुंबईकर देतील.
* मुंबईत जलबोगदे बनविले आहेत. ते तुमच्या खालून केव्हा गेेले ते तुम्हाला समजले देखील नाही
* मुंबईमध्ये शिवसैनिक असेपर्यंत महिला सुरक्षीत.
* भाजपाची संस्कृती पाहा. त्यांच्या जाहिरातीत आई पकवते असं म्हटलंय ,आई पकवते का कधी ?