वडेट्टीवार यांची ताबडतोब मंत्री पदावरून हकालपट्टी करावी – चित्रा वाघरत्नागिरी, प्रतिनिधी : ओबीसी जनतेची दिशाभूल करण्याचं काम मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. त्यामुळे असल्या फसव्या, कामचुकार विजय वडेट्टीवार या मंत्र्याला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, यांनी ओबीसी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकलेली आहे. त्यामुळे यांची ताबडतोब मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, असल्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे, त्या आज रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की, ओबीसींना मुख्य प्रवाहातून बाहेर काढण्याचे कुटील कारस्थान या सरकारचं चाललेलं आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं हे फक्त आणि फक्त सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालेलं आहे. इंपेरीकल डाटा जर तयार केला गेला असता, तर आरक्षण टिकलं असतं. मात्र सरकानं तस केलं नाही असा आरोप वाघ यांनी यावेळी केला.
दरम्यान मागासवर्ग आयोग गठीत करण्याची जी फाईल होती, ती मुख्यमंत्र्यांकडे 14 महिने धूळखात पडलेली होती, अशी माहिती आमच्याकडे आलेली होती. तुम्ही आज सत्तेमध्ये आहात, सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी एकत्र येत तात्काळ मागावर्गीय आयोग गठीत करायला हवा होता, आणि इंपेरिकल डाटा बनवायला हवा होता. ते झालं नाही, त्यामुळेच मराठा आरक्षणासारखंच काम ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचं माती करायचं काम या सरकारने केलं असल्याची टीका चित्रा वाघ यांनी यावेळी केली.
ओबीसी जनतेची दिशाभूल करण्याचं काम मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. 22 दिवसांपूर्वी त्यांनी सांगितलं होती, आम्ही ओबीसी आयोग गठीत करतो, इमपेरिकल डाटा बनवतो, ते त्यांनी अद्याप केलेलं नाही. ओबीसींचं राजकिय आरक्षण काढूनच घ्यायचं, ही सरकारची नीती आहे. त्यामुळे असल्या फसव्या, कामचुकार विजय वडेट्टीवार या मंत्र्याला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, यांनी ओबीसी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकलेली आहे. त्यामुळे यांची ताबडतोब मंत्री पडवरून हकालपट्टी करावी, असल्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा, ही आमची मागणी असल्याचं चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या. त्याचबरोबर भाजपकडून 1000 ठिकाणी चक्काजाम करण्यात येणार असल्याचं चित्रा वाघ यांनी रत्नागिरीत घेतलेल्या परिषदेत म्हटलं आहे.















