रत्नागिरी : शिवसेना-भाजपने युती म्हणून २०१९ च्या निवडणुका लढल्या. परंतु सत्तेसाठी भाजपशी फारकत घेऊन कॉंग्रेसशी हातमीळवणी केली. मग ही गद्दारी नाही का, जे काँग्रेसच्या कुबड्या घेऊन नाचत आहेत, त्यांनी कोणाच्याही पेकटात लाथ घालायची भाषा करु नये, असा पलटवार उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.कॉन्ट्रॅक्टर म्हणून आमचा वडिलोपार्जीत व्यवसाय आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. परंतु ज्यांचा कोणताही व्यवसाय नाही, त्यांच्या ६ ते ८ मजली इमारती कशा, असाही प्रश्न पडु शकतो, असा टोलाही त्यांनी लगावला. दूरदृष्यवाहिणीद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उदय सामंत म्हणाले, गेली दोन दिवस रत्नागिरीत ऐतिहासिक आणि धार्मिक असे कार्यक्रम झाले. या दोन कार्यक्रमांच्या मध्ये एक ठाकरेंच्या सभेचा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. रस्त्यावरच्या सभेत टोमणे, खालच्या पातळीवरून जाऊन टीका, असा एककलमी बदनामीचा कार्यक्रम सुरू आहे. ते माझ्यापेक्षा वयाने आणि मानाने मोठे आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्धल मला आदर आहे. परंतु मी काहीच उत्तर दिले नाही, तर मी घाबरलो, असा संदेश जाईल. म्हणून त्याच्या भाषणाला मल्ला उत्तर द्यायचे आहे. आधी जे शिवाजी पार्कवर सभा घेत होते, त्यांच्यावर आता रस्त्यावर, बोळात, चावडीवर सभा घेण्याची वेळ आली आहे. प्रत्येकवेळी माझ्या व्यवसायवरून टीका केली जाते. परंतु होय मी आढे ठेकेदार आमचा हा वडीलोपार्जीत व्यवसाय आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. पण ज्यांचा काहीच व्यवसाय नाही, त्यांची घरे, ६ आणि ८ मजली कशी, असा प्रश्न पडु शकतो. दुसऱ्याकडे बोट दाखविताना आपल्याकडे चार बोटं असतात याचे आत्मचिंतन त्यांनी करावे. रत्नागिरीची जंता सुसंस्कृत आहे. अपशब्द वापरणाऱ्याना जनताच धडा शिकवेल.
खरे गद्दार कोण ते बघा…
गद्दारांना गाडायचे आहे, या उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याची आपण पूर्ण सहमत आहोत. बाळासाहेब ठाकरे सांगायचे की, मी शिवसेनेची कधी काँग्रेस होऊ देणार नाही. अशी वेळ आली तर आपण पक्ष बंद करू. पण आता ठाकरे शिवसेना काँग्रेससोबत गेली आहे. ही खरी गद्दारी आहे आणि ती गाडायला हवी आहे, अशी टीका मंत्री सामंत यांनी केली.
मुस्लिम समाजाबाबत १५ दिवसात प्रचिती
मुस्लिम समाज हा वर्षानुवर्षे माझ्या सोबत आहे. या समाजाचे आणि आमचे वेगळे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे कोण कुठे गेलेले नाही. येत्या पंधरा दिवसात मुस्लिम समाज आपल्या बरोबर असल्याची प्रचिती सर्वांनाच येईल. मुस्लिम बांधवांचा एक मोठा कार्यक्रम होणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.