
तुम्हाला जे वंदनीय बाळासाहेब कळले होते, त्याप्रमाणे तुम्ही वागला नाहीत, म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांना उठाव करायला लागला : उदय सामंत
दिल्लीवरून कागद येतो आणि काही लोकांना इथे वाचून दाखवावा लागतो : उदय सामंत
रत्नागिरी : कालचा वाद हा शिवसेना विरुद्ध काँग्रेस सेना असा होता, तसेच तुम्हाला जे वंदनीय बाळासाहेब कळले होते, त्याप्रमाणे तुम्ही वागला नाहीत, म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांना उठाव करायला लागला, असा टोला शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे. ते आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
कालच्या शिवाजी पार्क वरील राड्याबाबत बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून काल शिंदे साहेबांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्मृतीस्थळावर असताना काही लोकांचं धाडस झालं नाही, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्मृतीस्थळावर नमस्कार करून आल्यानंतर काहींनी धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भाषेमध्ये राडा घालण्याचा प्रयत्न केला. वंदनीय बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती नाही तो विचार होता, आणि त्यांच्या विचारांचे वारसदार हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत, तर ते देशामध्ये आहेत, आणि जगमध्ये देखील आहेत. त्याच्यामुळे प्रॉपर्टीचा वारसदार एखादा होऊ शकतो, पण विचारांचा वारसदार त्याच्या सातबाऱ्यावर कोणी नाव लावू शकत नाही. तुम्हाला जे वंदनीय बाळासाहेब कळले होते, त्याप्रमाणे तुम्ही वागला नाहीत, म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांना उठाव करायला लागला, असा टोला देखील उदय सामंत यांनी यावेळी लगावला.
तसेच आमच्या पक्षाचा विचार वंदनीय बाळासाहेबांचा विचार आहे असं देखील ते यावेळी म्हणाले.
दरम्यान कालच्या पत्रकार परिषदेने बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. माननीय अमित शहा यांच्या मोफत अयोध्या वारीच्या वक्तव्यावर टीका करण्यात आली, जेणेकरून राम मंदिराचं किंवा रामाचं दर्शन होऊ नये हा त्या पत्रकार परिषदेचा गाभा होता. गेले आठ दिवस जर आपण बघत असाल तर दिल्लीवरून कागद येतो आणि काही लोकांना इथे वाचून दाखवावा लागतो, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. अमित शहा काय बोलले यापेक्षा नितीशकुमार काय बोलले हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, पण त्यावर हे कोणीच काही बोलत नाहीत, असं देखील ते यावेळी म्हणाले.
मराठा समाजाला आम्ही टीकणारं आरक्षण देऊन दाखवणार आहोत, तसेच निजामशाहीकालीन ज्या कुणबी नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र देणार आहोत ही आमची भूमिका स्पष्ट आहे. तसेच ओबीसींवर अन्याय होणार नाही असं देखील ते यावेळी म्हणाले.