
मुंबई : सध्याचे युग हे डिजिटल युग आहे, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विभागातील प्रत्येकाने डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग केला पाहिजे, आपल्या विभागाची कामे, प्रकल्प व चांगल्या योजना जनसामान्यांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर कसा करता येईल हे बघायला हवे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आज झालेल्या विभागनिहाय क्षेत्रिय स्तरावरील बैठकीत ते बोलत होती. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली.

लोकप्रतिनिधी व विभागाचे अधिकारी यांच्यामध्ये समन्वय राखला गेला पाहिजे. प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. लोकप्रतिनिधींच्या विभागात विकासाची कामे ही दर्जेदाररित्या करावीत. सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रतिमा जनमानसामध्ये उंचावेल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. अशा अनेक महत्त्वपूर्ण सूचना यावेळी मंत्री चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, सचिव संजय दशपुते तसेच छत्रपती संभाजी नगर, नांदेड, अमरावती व नागपूर या प्रादेशिक विभागांतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.