रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरीत आज मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. रत्नागिरीसह चिपळूण, संगमेश्वर, देवरुख आदी पट्ट्यात पावसाने मान्सूनच्या आगमनाची चुणूक दाखवली. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे.
गेले काही दिवस रात्रीच्या वेळेस पावसाचा शिडकावा होत आहे. मात्र दमदार पाऊस पडत नाही. आजहि दुपारनंतर आभाळ भरून आलं होतं. ढगाळ वातावरण, त्यात अधूनमधून गार वारा. त्यामुळे पाऊस त्याच्या आगमनाची चाहूल देत होता. त्यात वाढत्या उष्म्यामुळे जनता हैराण झाली होती. अखेर दुपारनंतर प्रथम देवरुखमध्ये विजांच्या आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसायला सुरुवात झाली. त्यानंतर चिपळूण, रत्नागिरीतही मेघगर्जनेसह सरी कोसळू लागल्या. जवळपास अर्धा तास काही ठिकाणी रिमझिम, काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली असली तरी उकाड्याने हैराण झालेल्यांना मात्र काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दरम्यान सध्या शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे, कारण पेरण्या खोळंबल्या आहेत.