मुंबई, दिनेश चिलप मराठे : देवा या मराठी सिनेमाला थिएटर मिळत नसल्याने आणि चित्रपटगृहात बाहेरील खाद्यपदार्थ घेवून जाण्यास मज्जाव करणाऱ्या चित्रपटगृहांच्या मालकांना मनसेने खळ्ळ खट्ट्याक चा इशारा दिला. डोंगरी येथील प्रमियर गोल्ड सिनेमागृहात धडक देत, थिएटर मालकांना निवेदन दिले.
सलमान खान आणि कटरीना कैफ यांचा बहुचर्चीत सिनेमा टायगर ज़िंदा है प्रदर्शित होत आहे. याच देवा हा मराठी चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्याला चित्रपटगृह उपलब्ध होत नसल्याने त्यांची निराशा झाली. टायगर जिंदा है चित्रपटाच्या निर्मात्याने आपल्या नावाचा व बळाचा वापर करीत मुंबईतील सर्व मोक्याच्या चित्रपट गृहांवर कब्जा केला आहे. मग बाकी मराठी निर्माते करायचे काय? कोठे जायचे? हिंदी चित्रपट निर्मात्यांची दादागीरी ही फक्त महाराष्ट्रात सुरु आहे. अन्य दक्षिणेतील गैर हिंदी राज्यात हिंदी चित्रपट निर्मात्यांची दादागिरी सहन केली जात नाही. तमिळ, तेलगु, कानडी, मल्यालम, आसामी या राज्यांत त्यांच्याच भाषिक चित्रपटांना आधी सन्मान दिला जातो. मग हाच नियम मराठी चित्रपटाबाबत महाराष्ट्रात का नाही? असा प्रश्न मनसेचे चित्रपट पदाधिकारी मोहम्मद युनुस शेख, वीरेंद्र पाटील, विभाग अध्यक्ष केशव मुळे, विनोद अरगिले यांनी केला आहे. तसेच चित्रपटगृहात बाहेरील खाद्य पदार्थ नेण्यास चित्रपटगृह मालकांचा विरोध ही मोडीत काढावा म्हणून मनसेच्यावतीने दुसरे निवेदन दिले. यावेळी महाराष्ट्र चित्रपट (नियमन) कायदा,1953 व महाराष्ट्र चित्रपट (नियमन) नियम,1966 अंतर्गत असलेल्या नियमांचे पालन करीत चित्रपट गृहात येणाऱ्या प्रेक्षकांना स्व आवडीचे जवळील खाद्य पदार्थ प्रेक्षका गृहात नेण्यास मज्जाव करू नये, असे सांगत प्रत्येकाला मुलभुत अधिकार घटनेद्वारे देण्यात आलेले असून त्याचे चित्रपटगृहाच्या मालकांनी पालन करावे, असे सांगत मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा दिला.