
रत्नागिरी : गणपतीपूर्वी एक लेन पूर्ण करण्याचे आश्वासन देतात, म्हणजे कोकणी जनतेवर उपकार करतात का? गेल्या सतरा वर्षात रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हात टेकले. आता सरकारला जाग आणण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने कोकण जागर पदयात्रेचे आयोजन मनसेने रविवारी 27 ऑगस्ट रोजी केलं असल्याचं मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी सांगितलं.
रत्नागिरी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्थेविरोधात कोकण जागर पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. एकाच दिवशी आठ टप्प्यात पनवेल ते लांजा दरम्यान शांततापूर्ण वातावरणात आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनाचा हा प्रारंभ आहे. यापुढच्या आंदोलनाची दिशा मात्र वेगळी असेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
लांजा ते वेरळ दरम्यान आयोजित पदयात्रा सकाळी 7 वा. सुरु होणार आहे. यात रत्नागिरी, लांजा व राजापूरमधील मनसे कार्यकर्ते, कोकणी जनता, स्वत: युवानेते अमित ठाकरे यांच्यासह पदाधिकारी सहभागी होणार आहे.
मागील सतरा वर्ष महामार्गाचे चौपदरीकरण रखडले आहे. यावर आतापर्यंत जवळपास 15 हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. अडीच हजारहून अधिक लोकांचा अपघाती मृत्यू झाला असल्याचे अविनाश अभ्यंकर यांनी सांगितले. कोकणात तीन खासदार व चौदा आमदार असूनही हा महामार्ग पूर्ण होत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाबाबत हात टेकले असल्याचे एका कार्यक्रमात सांगितले. मुंबई-पुणे हायवे, समृध्दी महामार्गाचे काम तीन-चार वर्षात होते. आता या महामार्गाची नजर व दृष्ट काढायची राहिली असल्याचे त्यांनी सांगितले.
महामार्गाबाबत आजही आश्वासनांची खैरात राज्यातील मंत्र्यांकडून सुरु आहेत. गणपतीपूर्वी एका लेनचे काम पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. परंतु महामार्गावरुन प्रवास करताना तशी परिस्थिती दिसत नाही. आता हा विषय मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हाती घेतला आहे. महामार्ग पूर्ण होईपर्यंत मनसेकडून यावर नजर ठेवली जाणार आहे. कोकणी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. रविवारची पदयात्रा शांततापूर्ण मार्गाने होणार असून कोकणी जनतेने यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी रत्नागिरी शहरप्रमुख अद्वैत कुलकर्णी उपस्थित होते.