नवी दिल्ली : गोव्यात सत्तास्थापन करण्यासाठी हालचाली न करणे कॉंग्रेसला चांगलेच महागात पडले. भाजपाने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आणि राज्यपालांनी त्यांना निमंत्रण दिल्यानंतर कॉंग्रेस नेतृत्वाला जाग आली. यानंतर या पक्षाने सर्वोच्च न्यायालयात भाजपाच्या सत्तास्थापनेला आव्हान दिले. त्याची सुनावणी आज झाली. यात न्यायालयाने सरकारस्थापनेसाठी तुम्ही राज्यपालांकडे संपर्क का साधला नाही? असा प्रश्नच कॉंग्रेसला विचारण्यात आला तसेच याचिका फेटाळून लावत सत्तास्थापनेस स्थगिती देण्यास नकार दिला. यामुळे कॉंग्रेसची चांगलीच नाचक्की झाली आहे. गोव्यात भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर हे आज संध्याकाळी पाच वाजता सत्ता स्थापन करणार आहेत.
गोवा विधानसभेत १६ मार्चला विश्वासदर्शक ठराव मांडून बहुमत सिद्ध करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. पर्रिकर यांचा सत्तास्थापनेचा दावा फेटाळून लावण्याविरोधात तुमच्याकडे सबळ पुरावे आहेत का? तसेच बहुमतासाठी आवश्यक असणारे पुरेसे संख्याबळ आहे का ? असे प्रश्नच न्यायालयने कॉंग्रेसला विचारले आहेत. ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेत बहुमतासाठी २१ सदस्यांची आवश्यकता आहे. भाजपाकडे १३ तर काँग्रेसकडे १७ असे संख्याबळ आहे. परंतु, छोट्या पक्षांसह अपक्षांना सोबत घेऊन भाजपा सत्ता स्थापन करणार आहे.