मुंबई : प्लास्टिकचा वापर व कचरा समुद्रात टाकण्याची सवय नष्ट व्हावी यासाठी कांदळवन कक्ष, मुंबई ने मुंबई आणि नवीमुंबई परिसरातील आठ ठिकाणी स्वच्छ कांदळवन मोहिम राबविण्याचे निश्चित केले असून त्याचा शुभारंभ उद्या दि. १६ डिसेंबर २०१७ रोजी कांदळवन कक्षाचे प्रमुख, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक एन. वासुदेव यांच्या हस्ते होणार आहे.
मुंबई आणि परिसरामध्ये कांदळवन वृक्षांकडून मोठ्याप्रमाणात किनारी प्रदेशाचे संरक्षण होते. तसेच उपजीविकेच्या अनेक संधी मच्छिमारांना उपलब्ध होतात. तथापि लाटांमुळे येणाऱ्या प्लास्टिक व इतर कचऱ्यामुळे कांदळवन वृक्षाची मुळे झाकली जातात. तसेच हा कचरा झाडांच्या फांद्यांमध्ये अडकून राहातो. त्यामुळे कांदळवन परिसर जैवविविधतेने संपन्न असूनही विद्रुप दिसू लागतो. तसेच कांदळवन वृक्षाच्या वाढीवर त्याचा विपरित परिणाम होतो. हे लक्षात घेऊन कांदळवन कक्षाने “स्वच्छ कांदळवन” ही मोहिम आखली असून ही मोहिम दहिसर, बोरिवली, वर्सोवा,बांद्रा, शिवडी, भांडूप, (६ मुंबई) तुर्भे व ऐरोली ( २ नवी मुंबई) या ठिकाणी राबविण्यात येणार आहे. कार्टर रोड येथे दुपारी ३.३० वाजता या मोहिमेचा शुभारंभ होईल. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी संबंधित वनक्षेत्रपाल किंवा विभागीय वन अधिकारी कार्यालय,ब-६८ कामगार नगर, टिळकनगर स्टेशनजवळ कुर्ला पूर्व, मुंबई ४०० ०२४ या कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक मा हितीसाठी ०२२- २५२२००९७ या दूरध्वनी क्रमांकावरही संपर्क साधता येईल असे आवाहन मुंबई कांदळवन संधारण घटकाचे विभागीय वनाधिकारी मिलिंद पंडितराव यांनी केले आहे.
कांदळवने आणि पाणथळ जमिनी यासंबंधीच्या
तक्रारी करण्यासाठी दोन नवीन संकेतस्थळे
उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक ८७/२०१३ मध्ये व कांदळवन संबंधित तक्रारींसाठी फौजदारी जनहित याचिका ४६/ २०१३ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार दोन्ही विषयांसाठी आयुक्त,कोकण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या कामकाजासाठी दोन स्वतंत्र तक्रार निवारण संकेतस्थळे सुरु करण्यात आली आहेत. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कांदळवनांसाठीmumbaimangroves.org आणि कोकण विभागातील पाणथळ क्षेत्रासाठी konkanwetland.com ही ती दोन स्वतंत्र तक्रार निवारण संकेतस्थळे आहेत, ज्याचा शुभारंभ दि. १६ डिसेंबर २०१७ रोजी ४ वाजता कांदळवन कक्षाचे प्रमुख एन. वासुदेवन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.