रत्नागिरी : हापूस आंब्यांचा सुगंध आता रत्नागिरीतून वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये दरवळणार आहे. मंडणगड आणि दापोली तालुक्यातून हापूसच्या पहिल्या पेट्या तेथे रवाना करण्यात आल्या आहेत. बाजारात पहिली पेटी आपल्याकडूनच जावी यासाठी शेतकर्यामध्ये मोठी स्पर्धा असते. यंदा तो मान मंडणगड आणि दापोली तालुक्यातील शेतकर्यानी मिळवला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात आंब्याचे उत्पादन करुन जिह्यातील पहिल्या पेट्या मार्केटमध्ये पाठविण्यात आल्या आहेत.
मंडणगडमधील वेसवी येथील पांडुरंग बेलोसे यांच्या बागेतील चार डझन हापूस आंब्याची पेटी तर दापोलीतील केळशी गावातील शेतकरी अशोक केळकर यांच्या बागेतील पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना झाली आहे. डझनाला दोन हजार रुपये, याप्रमाणे पेटीला आठ हजारांचा भाव मिळाला आहे.