रत्नागिरी : कोकणाचा राजा अर्थात हापूस आंब्याची दमदार एन्ट्री बाजारामध्ये झालीय. मात्र हवामानाचा परिणाम सध्या हापूसच्या उत्पादनावर झालेला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आता आंब्याच्या दरावर पण पहायला मिळतोय. एप्रिल महिना उजाडला आहे. मात्र स्थानिक बाजारात अजूनही हापूसचे दर वधारलेलेच आहेच. 800 रूपये ते 1200 रुपये डझन असा दर सध्या स्थानिक बाजारात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच सध्या हापूस आहे. हवामानातील बदलाचा परिणाम या हापूसच्या पिकावर झालाय. सुरुवातीला मोठ्या प्रमाणात कैरी गळ झाल्यामुळे आंबा उत्पादन कमी आहे. दरवर्षी मार्च महिन्यात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात व्हायची, मात्र यावर्षी एप्रिल उजाडला तरी आंबा स्थानिक बाजारात तसा तुरळकच दिसतो. त्यामुळे त्याचे परिणाम हापूसच्या किमतीवर पहायला मिळत आहेत. त्यामुळेच चार डझनाच्या पेटीला तीन हजार रुपये मोजावे लागतायत. सध्या कोकणाप्रमाणेच केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्रप्रदेशमधून मोठ्या प्रमाणावर आंबा स्थानिक बाजारात आलाय. यावर्षी सोमवार पर्यत ६४ हजार आंब्याच्या पेट्यांची वाशी मार्केटला विक्री झाली आहे. मात्र गेल्या वर्षी याच महिन्यात ७० हजारापर्यत आंब्याच्या पेट्यांची विक्री झाली होती. त्यामुळे हवामान, उत्पादन कमी यामुळे फळांच्या राज्याच्या किमती अजून तरी सर्वसामान्य कोकणी माणसाच्या आवाक्यात आलेल्या नाहीत.