मुंबई : देवगड हापूसच्या नावाखाली इतर भागातील हापूस हा देवगड हापूस म्हणून मुंबई बाजारपेठेत विकला जात होता. ग्राहकांची फसवणूक होऊ नये व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार व शेतकरी यांचा आंबा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने परळमध्ये आंबा महोत्सव सुरू करण्यात आला आहे. स्वाभीमान संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून परळ येथील दामोदर हॉल मैदानात आंबा महोत्सव सुरू झाला आहे. ८ तारखेपर्यंत तो सुरू असेल. ६ ते ७ मे असे दोन दिवस चालणाऱ्या या आंबा महोत्सवाला पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. लोकाग्रहोत्सव महोत्सवाचा एक दिवस वाढविण्यात आला आहे. सकाळी १० ते रात्री १० या वेळेत महोत्सव सुरु असेल.
आंबा महोत्सवाचे हे पहिलेच वर्ष आहे. त्याचे उदघाटन ६ मे रोजी नितेश राणे यांनी केले. आमदार कालिदास कोळंबकर, माजी नगरसेवक सुनील मोरे, नगरसेविका सुप्रिया मोरे, देवगड तालुका अध्यक्ष संदीप साटम, डॉ.अमोल तेली आदी उपस्थित होते.
आंबा महोत्सवात ३५ स्टॉल लावण्यात आले आहेत.त्यात देवगड तसेच इतर भागातील हापूस आंबे, फणस तसेच आंबा पल्प, आमरस, फणस पोळी, कोकणचे सरबत यांसारख्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे.त्याचबरोबर सिंधुदुर्ग तसेच अन्य जिल्ह्यातील आंबा व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी व्यावसायिकांना महोत्सवात विनाशुल्क स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. आंबा महोत्सवातील देवगड आंबा हा रसायन विरहित असून त्याला आंतरराष्ट्रीय ‘ग्लोबल अप’ हे प्रमाणपत्र मिळाले आहे.