रत्नागिरी : यावर्षी हापूसचे उत्पादन फारच कमी आहे. शेतकऱ्यांचा हापूसवर झालेला खर्चही निघणे कठीण आहे. स्थानिक शेतकऱ्यांची ही स्थिती असताना सध्या बाजारात कर्नाटकी आंबा मोठ्या प्रमाणावर येत आहे. मात्र जिल्ह्यातील काही विक्रेते कर्नाटकी आंबा हापूसच्या नावाने विकत आहेत. त्यांच्याविरोधात स्थानिक आंबा उत्पादक शेतकरी, बागायतदार आक्रमक झाले आहेत. आशा विक्रेत्यांना भेटून त्यांना समज देण्यात येणार आहे. कर्नाटकी आंब्याची विक्रि हापूसच्या मुळावर आल्यामुळे हापूसची घसरणारी पत सुधारण्यासाठी हा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आल्याचे बागायतदारांनी सांगितले.
रत्नागिरी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेला पावस परिसर आंबा उत्पादक संघ अध्यक्ष बावा साळवी, जिल्हा आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत, ईशांत सावंत, तुकाराम घवाळी, प्रसन्न पेठे, दिपक राऊत यांच्यासह उपस्थित बागायतदारांनी याबाबत माहिती दिली. हापूस कमी असल्यामुळे काही बागायतदारांनी कर्नाटकी आंबा मुंबई, पुण्यासह स्थानिकपातळीवर विक्री करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हापूस खाणार्या ग्राहकांकडून तक्रारी येत आहेत. हापूसचे महत्व कमी झाले असून हापूसला चव नाही अशी अनेकांची मत आहेत. हापूस बदनाम होत असून वेळीत त्यावर रोख लावावा लागणार आहे. कर्नाटकी आंबा विकणार्यांना सुरवातीला भेटून समजावण्यात येईल. त्यानंतरही ते ऐकले नाहीत तर कडक भुमिका घेतली जाईल असं यावेळी सांगण्यात आलं. तसेच बागायतदारांच्या प्रश्नाबाबत रस्त्यावर उतरावे लागले तरीही त्याची तयारी केल्याचा ईशारा बागायतदारांनी दिला आहे.
शासनाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर भविष्यात आक्रमक भुमिका घेणार असल्याचेही यावेळी सांगितले.
श्री. साळवी म्हणाले, गेली सात वर्षे बागायतदार अडचणीत आहेत. यंदा बँकेचे हप्ते, औषधांचा खर्च आणि कामगारांचा पगार देता येणार नाही अशी परिस्थिती आली आहे. उन्हाचा कडाका, थ्रिप्स, तुडतुडा आणि अकवाळी पावसामुळे उत्पादन दहा ते बारा टक्केच आले आहे. याबाबत सरकारचे लक्ष वेधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सध्याच्या परिस्थितीचा सर्व्हे कृषी विभागाकडून तात्काळ होणे आवश्यक आहे. कोकण कृषी विद्यापिठाने अहवाल दिलेला असतानाही त्यावर कार्यवाही झालेली नाही. याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा होऊन कृषीमंत्री, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून अपेक्षा आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं.