रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाच्या 85 व्या वर्धापनदिनी विविध पुरस्कारांनी समाजातील अनेक व्यक्तींना गौरवण्यात आले. जोशी पाळंद येथील भगवान परशुराम सभागृहात पुरस्कार वितरण समारंभात पार पडला.या वेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनय नातू, उपाध्यक्ष स्मिता परांजपे, विश्वास बापट, कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, नारायण शेवडे, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, कोषाध्यक्ष सौ. राधिका वैद्य यांच्यासमवेत पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. (कै.) सुधा वसंत बडे आदर्श महिला पुरस्कार डॉ. निशिगंधा पोंक्षे, सौ. आसावरी ओक, सौ. मधुरा सोहनी यांना, संस्कृतप्रेमी पुरस्कार वेदमूर्ती दत्तात्रय लेले गुरुजी, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर शौर्य पुरस्कार बाबल आल्मेडा व निरंकार गोयथळे यांना प्रदान केला. समशेरबहाद्दर पुरस्कार गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळेतील अथर्व पाटीलला प्रदान दिला. मंडळाच्या वसतीगृहातील आदर्श विद्यार्थी पुरस्कार कल्पेश जोशी याला आणि विद्यार्थिनी पुरस्कार पूर्वा जोगळेकर आणि (कै.) उदय दिनकर ओक स्मृती पारितोषिक हर्षवर्धन जोशी याला देण्यात आले. जीवनगौरव पुरस्कार कर्मचारी नेते सुधाकर सावंत यांना तर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानला विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले.
कै. सत्यभामाबाई फडके निधीतून चिंचखरी येथील श्रीमती विजया फाटक यांना आर्थिक मदत देण्यात आली. लोकमान्य टिळक पारितोषिक अक्षय नवरे, अमृता नायक, तन्वी दाते, कपिल केळकर, प्राची पाथरे, विनय मोरे यांना देण्यात आले. वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार आणि मंडळाच्या मानापमान नाटकास संगीत नाट्य स्पर्धेतील यशाबद्दल कलाकार, तंत्रज्ञांना सन्मानित केले. तसेच सीए असोसिएशनचे नूतन अध्यक्ष श्रीरंग वैद्य, चैतन्य वैद्य, सौ. अनुजा आगाशे आणि पेंटर प्रवीण कांबळे यांचाही गौरव केला.
चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी मंडळ समाजातील गुणवंतांचा सन्मान करून पाठीवर थाप मारत आहे. या व्यक्तींच्या आदर्शातून भावी पिढीसुद्धा चांगली घडेल, असे प्रतिपादन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी केले.
दिग्दर्शक वामन जोग म्हणाले की, नाटक हा संस्कार आहे. नाटकाची प्रक्रिया जाणण्यासाठी संयम व सातत्य हवे. प्रामाणिक कलाकार मिळाल्यानेच मंडळाच्या मानापमान नाटकास बक्षीस मिळाले. पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी मंडळाचे कौतुक केले. विविध प्रकारचे उपक्रम राबवताना समाजातील सर्व ज्ञातीबांधवांचे कौतुक करण्याचे धाडस संस्था करत असल्याबद्दल अभिनंदन केले.