मुंबई : मानवी तस्करी रोखण्यासाठी कडक पाऊले उचलण्यात येणार असून यासाठी कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची सूचना करण्यात येईल. तसेच तस्करी झालेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना परत आणण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले.
विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ते बोलत होते. याबाबत उपस्थित झालेल्या उपप्रश्नावर उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले, मुंबईसह देशभरातील अल्पवयीन मुलांची तस्करी करणारी टोळी पकडली गेली असून 34 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन पालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. पासपोर्ट बनविताना अल्पवयीन मुलांच्या पोलीस व्हेरिफिकेशनची अट शिथिल करण्यात आली होती. ही अट पुन्हा लागू करावी, याबाबतची विनंती केंद्र शासनाला करण्यात आली आहे. अशा गुन्ह्यांमध्ये कडक शिक्षेची तरतूद करण्याबाबत विधी व न्याय विभागाचे मत मागवून तशी शिफारस करण्यात येईल. तसेच कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये मुल हरविल्याची तक्रार आल्यास त्याची गांभीर्याने तात्काळ दखल घेण्यात यावी, अशा सूचनाही संबंधितांना देण्यात येतील.
या विषयाशी संबंधित झालेल्या चर्चेत सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, विद्या चव्हाण, सदस्य भाई जगताप, हेमंत टकले, नारायण राणे यांनी भाग घेतला.