लेखक : प्रा. भूषण भोईर
३१ डिसेंबर २०१९, वुहान शहर चीन येथे अचानक निमोनिया रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचा मेल जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर आला. ही या अस्मानी संकटाची सुरुवात होती. हा नोवेल म्हणजेच कोरोना. ज्या व्हायरस वरती क्राऊनसारखे म्हणजेच राजमुकुटसारखे प्रोटीनचे आवरण असल्याचे समजले. W.H.O. च्या संकेतस्थळावरून प्रसारित झालेल्या माहिती नुसार जवळपास १८,५८९ लोकांचा मृत्यू झाला असून ४,१६,६८६ लोकांना याची लागण झाली. जगभरातील १९७ देशांमध्ये हा विषाणू थैमान घालत आहे.
असा हा महाभयंकर विषाणु निसर्गात आला कसा या बद्दल तर्क वितर्क सुरू आहेत. नुकताच हा विषाणू चीन देशाने स्वतः बनवून जगभरात पाठवला असा युक्तिवाद करणारे काही मेसेज पसरत होते, त्याचसोबत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर चीन देशावर करोडो डॉलर किमतीचा दंडात्मक दावाच ठोकण्याची तयारी दाखवली आहे.
वर देखी आपणा सर्वांना ही थिअरी पटेल. परंतु हा मानवी स्वभाव आहे जेव्हा काही गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात त्या गोष्टींना आपण एकतर दैवी शक्तींचा चमत्कार मानतो किंवा त्याचं खापर दुसऱ्या कोणावर मारून आपली जबाबदारी झटकून मोकळे होतो. असेच काही ट्रम्प महोदय करत आहेत. ते ही महामारी रोखण्यात असफल ठरत आहेत आणि त्याच वेळी चीन सफल होताना दिसत आहे हे दृश्य पाहता जनतेला काय उत्तर द्यायचं? तर साधा सोप्पा उपाय आरोप करून जनतेला त्यात व्यस्त ठेवायचं आणि मोकळ व्हायचं.
अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, वुहान शहरात ६ अद्ययावत प्रयोगशाळा आहेत. ज्या अशा विषणुंवर अभ्यास करत आहेत. अमेरिकेकडे त्याहून जास्त अद्ययावत प्रयोगशाळा असून तिथेही हेच खेळ सुरू आहेत मग कशावरून हे अमेरिकेने केले नाही?
रशिया वाचला कारण त्याने गोष्टी गंभीर पणे घेतल्या
या सगळ्यातून चीनचा मित्रदेश रशिया मधे कोरोना पोहोचलाच नाही असे सांगितले जाते. पण ते खरे नाही, तिथे देखील कोरोना पोहोचलाच. चीन आणि रशिया शेजारी देश आहेत. बाजूच्या राज्यात जे काही सुरु आहे ते पाहून रशियाने ताबडतोब सीमा बंद केल्या. इतर देशातून येणाऱ्या रुग्णासाठी क्वारनटाईन सेंटर तयार ठेवले.जिथे येणाऱ्या प्रत्येकाला १४ दिवस देखरेख करण्यात आले. चीन मधून येणार्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली. तब्बल १,५६,००० लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. एवढी काळजी घेऊन देखील इटली येथून येणार्या प्रवासी लोकांबद्दल निष्काळजीपणा केल्याने रशिया मधे काही प्रमाणात हा विषाणु शिरलाच. रशिया वाचला कारण त्याने गोष्टी गंभीर पणे घेतल्या.
….चीनमधली महामारी आटोक्यात आली
आता चीन मधील महामारी कशी आटोक्यात आणण्यात आली ते पाहू. चीनमध्ये हुकुमशाही आहे, त्या मुळे तिथे असलेल्या प्रत्येक रुग्णालयांमध्ये फक्त आणि फक्त कोरोनाचेच रुग्ण राहतील यासाठी इतर सर्व रुग्ण बाहेर काढण्यात आले. सर्व शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या. अगदी अतिदक्षता असलेल्या सुद्धा आणि सगळ्याचा वापर फक्त करोनाशी लढण्यासाठी करण्यात आला. एवढेच काय, सहा दिवसात दिवसरात्र एक करून १००० आणि १३०० खाटांची दोन रुग्णालये उभारण्यात आली. जर चीन स्वतः वर हा विषाणु सोडून काही खेळ करणार होता तर मग त्याने स्वतः आधीच ही रुग्णालये तयार केली असती. त्यांना वेळेवर युद्धपातळीवर बनवले नसते. तसेच चीनकडे असलेला साथीच्या रोगांसाठी लढण्याचा अनुभव खूप कामी आला. अस म्हणता येईल, चीनने एकाएक sars, स्वाइन फ्ल्यू, इत्यादी रोगांसाठी लढण्यासाठी आधी देखील काही रुग्णालये बनवली होती ती देखील या वेळी कामाला आलीच. तसेच सर्वात महत्वाचं काही होत तर ते म्हणजे त्यांनी बनवलेली ट्रॅकिंग सिस्टम! रुग्णाने कुठे कुठे प्रवास केला? त्याचा कोणकोणत्या सहप्रवासी लोकांशी संपर्क आला त्या सहप्रवासी शोधणारी यंत्रणा चीनकडे होती. तसेच, सर्व चाचण्या सरकारने मोफत केल्या तसेच कोरोना हा आजार तेथील विमायोजनेत नव्हता त्याचे सगळे पैसे सरकारने विमा कंपन्यांना दिले. लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. तसेच इंटरनेटवरून रुग्णांच्या तपासण्या होत होत्या, तेथील निवडक नागरिक स्वयंसेवक म्हणून घरोघरी अन्नधान्य पोहोचवत होते. चाचण्या घेण्यासाठी आणि रुग्ण शोधण्यासाठी घरोघरी थर्मल डिटेक्टर घेऊन फिरत होते. एवढं सगळ करून देखील चीनला ह्या सगळ्यातून सावरताना तब्बल तीन महिने गेले. आणि जनजीवन सुरळीत होते ना होते तोच पुन्हा तेथील काही लोकांना कोरोना ची लागण झालेली असल्याचे आज बातम्यांमध्ये दाखवण्यात आले.
शोधनिबंध काय म्हणतो?
जर चीन ने हा व्हायरस बनवला असता तर त्याची लस देखील बनवून आज बाजारात विकून आर्थिक महासत्ता बनला असता. परंतु हा व्हायरस निसर्गतः अस्तित्वात आला असे म्हणणे ह्या विषाणूचा अभ्यास करणाऱ्या इडन बर्ग येथील विद्यापीठातील शास्त्रज्ञ अँड्र्यू रामबाउट, द स्क्रिप्ट रीसर्च इन्स्टिट्यूट मधील क्रिस्टियन अँडरसन तसेच, कोलंबिया युनिव्हर्सिटी मधील डब्ल्यू. अयान लीपिंग आणि सिडनी विद्यापीठातील एडवर्ड हॉम्स या चार वेगवेगळ्या विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यांनी विषाणूचा अभ्यास केला असता विषाणू वरील प्रोटीन चे आवरण जे मुकुटासारखे असते ते अतिशय जटिल पद्धतीने माणसाच्या पेशिंशी जोडले जाते आणि नंतर त्यातून आपले जनुकीय घातक माणसाच्या पेशी मधे सोडून तिथे त्याच्या प्रती बनवते. ह्या विषाणूच्या जनुकीय संरचनेचा आणखीन अभ्यास केल्यानंतर हे चारही वैज्ञानिक ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचले की अशा प्रकारचे जटिल काम कोणत्याही अद्यावत प्रयोगशाळांमध्ये अजून तरी बनवता आले नसून तसे घडवून आणणारे तंत्रज्ञान कोणाला अवगत झालेले नाही. तसेच SARS CV2 म्हणजेच नोवेल कोरोनाव्हायरस मध्ययुगीन काळातील आत्तापर्यंत माहिती असलेल्या वटवाघळं आणि खवली मांजर सारख्या प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या विषाणू सारखा म्हणजेच त्या काळातील वाटत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचा शोधनिबंध नुकताच the nature and medicine ह्या शोध ग्रंथात प्रकाशित करण्यात आला आहे ही माहिती फोर्ब्स ह्या नियतकालिकांनी दिली.
सुमारे 1100 ते 1200 वर्षापूर्वीचा विषाणू?
सांगायचे तात्पर्य म्हणजे मध्ययुगीन काळातील म्हणजेच आजपासून सुमारे 1100 ते 1200 वर्षापूर्वीचा विषाणू निसर्गाने पुन्हा मानवजातीवर सोडल्याचे दिसत आहे. काही वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार आधी माहिती असलेला कोरोना विषाणू अलिकडच्या काळात उत्क्रांत होऊन त्याचे रूपांतर नोवल करोना मधे झाले असणार किंवा जागतिक तापानवाढीमुळे हा विषाणू हवेत आला असणार. ह्यातील दुसरी शक्यता जास्त वाटत आहे. कारण प्रत्येक वेळी हे जीवघेणे विषाणु नेहमी चीन किंवा थंड प्रदेशातून जगभर पसरत आहेत. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे वाढत असलेले तापमान जे पुन्हा ह्या थंड प्रदेशातील बर्फ वितळवत आहे, परिणामी करोडो वर्षापूर्वी बर्फाच्छादित प्रदेशात सक्रिय असणारे दलदल, बर्फामध्ये गोठलेले जीवजंतू आणि त्यांच्या शरीरातील विषाणू तापमान पुन्हा वाढून बर्फ वितळून त्याच्या कैदेतून मुक्त होत आहेत, तसेच ह्या प्रदेशातील गोठलेल्या पाणथळ जागा, दलदल म्हणजेच permafrost पुन्हा सक्रिय दलदल होऊन बाहेर येत आहेत. वर उल्लेखिल्याप्रमाणे मध्ययुगीन काळातील बर्फ आता वितळला असणार ज्यातून हे विषाणू बाहेर आले असणार. ह्याला आणखीन जोड चीनच्या वाढत्या औद्योगिकरणाच्या हव्यासाने दिली अस म्हणता येईल. अधिकाधिक उत्पादन करण्यासाठी अधिकाधिक डोंगर टेकड्या पोखरल्या गेल्या. तेथील वन्यजीव आणि त्यांचे आसरे नष्ट केले गेले तसेच दलदली सारख्या ठिकाणी राहणाऱ्या वन्यजीवांमधे ह्या विषाणू चे संक्रमण झाले असणार आणि नंतर हे वन्यजीव विशेषतः वटवाघूळ आणि खवले मांजर तेथे राहत असलेल्या लोकांच्या आहारात आल्याने या महामारी चा माणसांमध्ये शिरकाव झाला असावा. वर उल्लेख केल्याप्रमाणे थंड प्रदेशातून बाहेर निघालेल्या विषाणूंची कितीतरी उदाहरणे जागतिक तापमान वाढीच्या मागील काही वर्षांमध्ये देता येतील. उदा. एशियन फ्ल्यू -1956, sars-2002, H7N9-2012, COVID 19- 2019 अस सगळ घडत असताना आपण या विषाणू शी लढताना आपली दिशा जागतिक तापमानवाढ आणि औद्योगिकरणामुळे होणाऱ्या दुष्परणामांपासून च्या मुद्द्यावरून नेहमी बदलली जात असल्याचं जाणवत आहे. उदाहरण द्यायचे झाले तर आफ्रिकेमधील युगांडा येथे औद्योगीकरणासाठी किंशासा हायवे बनवण्यात आला आणि तेथे काही निवडक जमातींच्यामध्ये असलेला hiv चा विषाणू 80 च्या दशकात या हायवे मुळे जगभर पसरला आजही त्यामुळे या हायवेला एडस हायवे म्हणून ओळखले जाते. त्यावेळी देखील लोक हे मान्य करायला तयार नव्हती की निसर्गात असं काहीतरी भयानक असेल आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा विषाणू अमेरिकेने जैविक युद्धासाठी तयार केला असावा असे तर्क वितर्क होत होते. त्या नंतर इबोला नावाचा विषाणू आला जो अगदी रोग्याच्या त्वचेला स्पर्श झाल्याबरोबर त्याचा देह काही दिवसात जिवंतपणी सडवू लागला असताना देखील हाच तर्क-वितर्क होत होता जो शंकेच्या सुया अमेरिकन प्रयोग शाळांकडे नेत होता. हे असे तर्क-वितर्क होत आहेत आणि होत राहतील कारण, निसर्गात माणसाला हरवण्या इतकी ताकद नाही. निसर्ग माणसा पुढे आणि त्यांनी उभ्या केलेल्या तंत्रज्ञानापुढे दुबळा आहे असाच आजवर माणूस समजत आला आहे आणि समजत राहील असं वाटतं आहे. कधी चीन देशाला दोष देऊन, तर कधी तेथे राहणाऱ्या लोकांच्या जीवन शैलीला दोष देऊन तर कधी, वटवाघळाकडे बोटं दाखवून, तर कधी खवलं मांजर इत्यादी प्रण्यांच मास खाल्यामुळे त्यांच्यात असलेला आजार मानवात संक्रमित झाला असं बोलले जात आहे. नीट निरखून पाहिलं तर अस लक्षात येईल की याला जबाबदार एकटा चीन नसून याला जबाबदार संपूर्ण मानवजात आहे. ग्रीक आख्यायिका मधे सांगितल्या प्रमाणे Pandora उघडल्यावर म्हणजेच आजार, मृत्यू, अज्ञात वाईट शक्ती ज्यात ठेवलेल्या दडवलेल्या आहेत अस खोक उघडल्यावर बाहेर येऊन उघडणाऱ्याला आणि त्याच्या सोबत संपूर्ण जगाला भेडसावू लागतात आणि विनाशाकडे घेऊन जातात. असा निसर्गाचा Pandora म्हणजेच निसर्गाचे विविध कोपरे जे नद्या खाड्यांमधे, डोंगर, दर्या , समुद्रात दडवलेले आहेत ते आपण आपल्या स्वार्थासाठी उघडणे बंद केले पाहिजे. जंगल टिकले पाहिजे, त्यातील वन्यजीवांना योग्य आसरा मिळाला पाहिजे, डोंगर-दऱ्या औद्योगिकरण करण्यासाठी खोदणे बंद केले पाहिजे अन्यथा Pandora उघडलाच म्हणून समजा. भारत देखील विकासासाठी चिंच मार्गावर चाललेला दिसत आहे. याचे कारण म्हणजे नुकताच केंद्र सरकरमार्फत संपूर्ण भारत खाणकाम करण्यासाठी परकीय गुंतवणुकीला उघडा केला आहे. ज्या मुळे भविष्यात किती pandora उघडले जातील काहीच सांगता येणार नाही.निदान आता तरी आपण शाहणे झाले पाहिजे अन्यथा विनाश अटळ आहे.
या एका वर्षात ऑस्ट्रेलियामधील दोन लाख हेक्टर जंगल जळून गेले, ॲमेझॉन खोऱ्यातील जगातील सर्वात जुने सर्वात घनदाट जंगलाला लाखो हेक्टर मध्ये वणवा लागला, अलास्का येथील 55 मिलियन वर्षांपूर्वी गोठलेले दल जागतिक तापमान वाढीमुळे पुन्हा सक्रिय झाले. उत्तर ध्रुवावरील बर्फ वितळून तेथील हिमनग वितळून त्यांवर वितळलेल्या पाण्याची तळी दिसू लागली आहेत. तसेच येथील ध्रुवीय अस्वले हजारो मैलांचा प्रवास करून त्यांचे रशिया मधे दाखल होणे. नुकताच वादळ येऊन गेल्यानंतर 20 मार्च पासून जवळपास दहा आखाती देशांमध्ये डेझर्ट लोकस्ट म्हणजेच करोडो नाकतोड्यांचे आकाश झाकून जाईल असे थवेच्या थवे दाखल होत आहेत एफ. अे. ओ. च्यामते ह्या नाकतोड्यां मुळे जवळपास 25 मिलियन लोकांची अन्नसुरक्षा धोक्यात येऊ शकते. वैज्ञानिकांच्या मते 2018 मधे जागतिक तापमान वाढीमुळे आलेल्या मेकुणू वादळाने वाहून आणलेल्या बाष्पयुक्त धुळीमुळे ह्या नाकतोड्यांना वाढण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे, पूर्वी अशी वादळे वर्षातून फक्त एक किंवा दोनदा येत असत ज्यामुळे काही काळासाठी योग्य वातावरण मिळाल्याने नाकतोडे जन्माला येत आणि एक तर मरून जात किंवा पुढे निघून जात परंतु जागतिक तापमान वाढीमुळे आता एकापाठोपाठ एक वादळे येऊन त्यांना हळूहळू कायमसाठी योग्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.
आता तरी माणूस शाहणा होऊन पृथ्वीला शरण जाईल की एकामागोमाग एक निसर्गाचे पंडोरे उघडत जाऊन सर्वनाश करेल?
वेळीच सावध व्हा आणि पृथ्वीला शरण जा साधे जीवन जगा तर आणि तरच आपण वाचू.
प्रा. भूषण विलास भोईर,
सह. प्रा. प्राणीशास्त्र विभाग,
सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर.