
राज ठाकरे यांची सभा
रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी: प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात आता मनसेनेही दंड थोपटले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट संकेत दिले. जनतेने शेवटपर्यंत या प्रकल्पाच्या विरोधात राहावं, मी शेवटपर्यंत जनतेसोबत राहीन असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.
राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात आशिया खंडातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. गेले काही महिने या प्रकल्पाला होत असलेल्या विरोधामुळे राजापूर तालुका चर्चेत आला आहे. त्यातच गेल्या महिन्यात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी परिसराला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली होती. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्वतः कात्रादेवी परिसरात ग्रामस्थाशी थेट संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महिलांनी आपल्या भावना राज ठाकरे यांच्यासमोर व्यक्त करत कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प कोकणात नको अशी स्पष्ट भूमिका मांडली. हे सरकार आंधळं आणि बहिरं असून ते आमच्या व्यथा समजून घेत नसल्याची खदखद महिलांनी यावेळी व्यक्त केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी बोलताना या प्रकल्पाच्या विरोधात तुम्ही शेवटपर्यंत ठाम भूमिका घ्या, मी माझा पक्ष शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहिन असं आश्वासन राज ठाकरे यांनी उपस्थित ग्रामस्थाना दिलं. मी एखादी गोष्ट हातात घेतली की तडीस नेतो. पण आता इथल्या जनतेला एकत्र रहावं लागेल, कडवट विरोध करावा लागेल. तुम्ही या निमित्ताने एकदा तुमचा विरोध दाखवून द्या, सरकार पुन्हा असे प्रकल्प कोकणात आणण्याचं धाडस करणार नाही, शासनाचा कोकणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल असंहि राज ठाकरे यांनी यावेळी जनतेला सांगितलं. पण कोकणाकडे सरकारचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, सुरुवातीला इथं विरोध होतो, मात्र त्यानंतर माणसं घरंगळत जातात अशी खदखद राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे आता जे विकले जातील त्यांना बोकळून काढा असंही राज ठाकरे यांनी उपस्थितांना आवाहन केलं आहे. सोन्यासारख्या जमिनी विकू नका, जमिनी विकायच्या पहिल्या बंद करा असं आवाहनहि त्यांनी यावेळी केले.
दरम्यान इथून गेल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना याबाबत भेटेन, त्यांना हा विषय माहिती असेलच पण पुन्हा एकदा मी मुख्यमंत्र्यांच्या कानात नीट सांगेन. तसेच हा प्रकल्प रद्द करण्यासाठी त्यांची भेट घेईन. मात्र शेवटपर्यंत तुम्ही तुमच्या विरोधावर ठाम रहा, असे सांगत या प्रकल्पाबाबत विरोधाची भूमिका मांडली.