नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केंद्र आणि राज्य सरकारे कचरा व्यवस्थापनाची व्यापक मोहीम सुरु करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. आकाशवाणीवरून साधलेल्या मन कि बात संवादात पंतप्रधानांनी सांगितले कि देशातल्या चार हजार शहरात पाच जून रोजी सुका आणि ओला कचरा गोळा करण्यासाठी कचरापेट्या उपलब्ध करून दिल्या जातील. हिरवी आणि निळी अशा दोन प्रकारच्या या कचरा पेट्या असतील. यापैकी निळ्या कचरा पेटीत सुका कचरा तर हिरव्या रंगाच्या पेटीत ओला कचरा गोळा केला जाईल. स्वयंपाक घरातील कचरा हा ओला कचरा असेल आणि तो हिरव्या कचरा पेटीत टाकावा असे पंतप्रधानांनी सांगितले. ह्या कचऱ्याचा शेतांमध्ये वापर करता येईल असे ते म्हणाले. कचरा हा संपत्तीचा स्रोत आहे असे जाणवल्यानंतर कचरा व्यवस्थापनाच्या नव्या पद्धती शोधल्या जातील असे ते म्हणाले.
लोकांना निसर्गाशी जोडणे हे संयुक्त राष्ट्रांचे यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाचे घोषवाक्य आहे. निसर्गाशी जोडले जाणे म्हणजेच पृथ्वीचे उत्तम संवर्धन असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. जे जग आपण पाहू शकणार नाही त्या जगाची काळजी घेतली पाहिजे या महत्मा गांधीजींच्या विचारांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. निसर्गाशी जोडले जाण्याची जागतिक मोहीम हि वैयक्तिक मोहीम ही बनली पाहिजे असेही ते म्हणाले. या मोहिमेला बळ देण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहनही पंतप्रधानंनी केले.
स्वच्छतेची संस्कृती विकसत करून हे ध्येय साध्य करण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील भारत साकारायला मदत होईल असा ठाम विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. एखाद्या व्यक्तीने यासाठी अविरत कार्य केल्यास त्यातून मोठी जन चळवळ उभी राहू शकते असे ते म्हणाले. त्यांनी यासंदर्भात अस्वच्छतेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मुंबईतल्या वर्सोवा समुद्र किनाऱ्याचे उदाहरण दिले. ८० ते ९० आठवडे काम करून हजारो टन कचरा गोळा केल्यानंतर आता वर्सोवा किनारा स्वच्छ आणि सुंदर बनला आहे, असे ते म्हणाले. ज्या एका व्यक्तीने हे काम सुरु केले आणि नंतर त्याचे मोहिमेत रुपांतर झाले त्या अफरोज शहा ह्यांना संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाचा Champions of The Earth हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे पंतप्रधानंनी सांगितले.
जम्मू काश्मीर मधील रियासी ब्लॉक पूर्णतः हगणदरीमुक्त झाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. राज्याने उत्तम उदाहरण समोर ठेवले असल्याचे सांगून पंतप्रधानांनी ह्या ब्लॉकमधील जनता आणि लोकप्रतिनिधींचे अभिनंदन केले. या मोहिमेत नेत्तृत्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि घराघरात जाऊन जागृती निर्माण करण्यासाठी मशाल मोर्चा काढणाऱ्या महिलांचेही पंतप्रधानांनी अभिनंदन केले.
फुटीरतावादी शक्ती डोक वर काढत असताना आंतरराष्ट्रीय योग दिवस हे भारताने जगाला दिलेले योगदान आहे असे पंतप्रधान म्हणाले. तणावमुक्त आयुष्य जगण्यासाठी योग महत्वाची भूमिका बजावते यावर पंतप्रधानांनी भर दिला. यंदाच्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कुटुंबातल्या तीन पिढ्यांनी एकत्र योग करावा अशी सूचना मिळाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आजी-आजोबा, आई-वडील, आणि मुलांनी एकत्र योग करावा आणि ही छायाचित्र NarendraModiApp किंपर mygov वर पाठवावीत असे त्यांनी सांगितले. १ जून ते २१ जून या दरम्यान आपण ट्विटर वर योग संबंधी लिहित राहू असेही पंतप्रधान म्हणाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आज असलेल्या जयंतीनिमित्त बोलताना पंतप्रधान म्हणाले कि नवी पिढी भारताचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिक आणि देशासाठी बलिदान दिलेल्यांबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुकता दाखवत आहे, याबद्दल आनंद वाटतो आहे. देशातील अनेक महान व्यक्तींनी आपले तारुण्य तुरुंगात व्यतीत केले आणि हालअपेष्टा भोगल्या ज्यामुळे आज लोक स्वतंत्र भारतात खुला श्वास घेऊ शकत आहे.
लोकशाहीत सरकारे उत्तरदायित्व निभावण्यासाठी बांधील असली पाहिजेत असा ठाम विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. केलेल्या कामाचे गुणमापन लोकांसमोर ठेवले गेले पाहिजेत असेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारच्या गेल्या तीन वर्षातील कामाचे मूल्यमापन गेल्या १५ दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये केले जात आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. ही सर्व प्रक्रिया सकारात्मक असल्याचे ते म्हणाले. विधायक टीका लोकशाहीला बळकट करते असे सांगून कुठल्याही देशासाठी हे मंथन महत्वपूर्ण असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन हे वेळात वेळ काढून ‘मन की बात’ वरील विश्लेषणात्मक पुस्तक प्रकाशनाला उपस्थित राहिल्याबद्दल पंतप्रधानांनी आभार मानले. या पुस्तकामुळे मन की बात ला नवा आयाम मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
रमझान महिन्याच्या प्रारंभाबद्दल पंतप्रधानांनी देशाला शुभेच्छा दिल्या. रमझान महिन्यात प्रार्थना, सद्भावना, दानधर्म यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाते, असे त्यांनी सांगितले. आपण भारतीय खूप भाग्यवान आहोत की, आपल्या पूर्वजांनी एकतेची परंपरा निर्मित केली असून, देशातील १ अब्ज २५ लाख लोकांनी याबाबत अभिमान बाळगायला हवा, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.