मालाड, ता. 20(निसार अली) : मालवणी प्रवेशद्वार क्रमांक 8 येथील आंबोजवाडी येथील अनेक समस्या आणि प्रश्नांविरोधात आम आदमी पार्टीने आंदोलन केले.
मालवणीतील प्रभाग क्रमांक 49 मध्ये कच्चे रस्ते जागोजागी घाण तसेच गटारे उघडी असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. जागोजागी कचरा आणि प्लास्टिक साचले आहे. प्लास्टिक जनावरे खात आहेत. सर्वत्र घाण आणि कचऱ्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. रहिवाशांच्या आरोग्यावर ही परिणाम होत आहे.
नागरी समस्यांकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याने आम आदमी पार्टी प्रभाग क्रमांक 49 च्या प्रभारी लारझी व्हर्गिस यांनी पालिका प्रशासनाला या बाबत पत्र व्यवहार केला. पालिकेकडून काहीच होत नसल्याने स्थानिकांना सोबत घेऊन त्यांनी फलक घेऊन पालिकेचा निषेध करत आंबोजवाडी मधील समस्यांवर पालिकेने त्वरित लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी केली आहे. तसेच लवकरात लवकर समस्या न सोडविल्यास पी उत्तर विभागीय सहायक आयुक्त यांच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा लारझी व्हर्गिस यांनी यावेळी दिला.