मुंबई, (निसार अली) : मालवणीतील बाल अधिकार संघर्ष संघटन व युवा संस्था यांनी पर्यावरण आणि बाल अधिकार या संकल्पनेतून बाल जल्लोष हा कार्यक्रम मालवणीत 30 नोव्हेंबरला साजरा केला. अंबोजवाडीमधील बालकांनी संपूर्णनोव्हेंबर महिन्यात विविध ठिकाणी बालकांचे हक्क, जगण्याचा-शिक्षणाचा-सहभागीतेचा-खेळण्याचा अशा विविध अधिकारांविषयी जनजागृती, पथनाट्य, नाटक, विविध गीते मानवी साखळी यांच्या माध्यमातून प्रचारप्रसार केला.
या कार्यक्रमाचा समारोप 30 नोव्हेंबरला अंबोजवाडी येथे उत्साहात साजरा झाला. नृत्य, गाणी, शायरी सादर करून बालकांनी आनंद साजरा केला. यावेळी कचरा व्यवस्थापन करण्यासंदर्भात बेसलाईन सर्वे करण्याचा सर्वे प्रोग्रॅम मान्यवरांच्या हस्ते लॉन्च झाला. तसेच सहभागी बालकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. युवा संस्थेच्या पुजा यादव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एन. एस. सय्यद, हेमंदिताई, रुक्साना शेख, आईशा मुल्ला यावेळी उपस्थित होते. युवाचे कार्यकर्ते, मालवणी युवा परिषद, बाल अधिकार संघर्ष संघटन, मालवणी कट्टा व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.