नवी मुंबई : कामानिमित्त तासंनतास उभे राहिल्याने पायांमध्ये वेदना सुरु होऊन किंचित सूज चढते.
परंतु, कधी कधी पायांना आलेली सूज वेरीकोज व्हेन्स या आजाराची लक्षणे असू शकतात. मॉल संस्कृतीमुळे या आजारात वाढ होण्याचा धोका आहे, अशी भीती वाशी येथील स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलने व्यक्त केली आहे.
वेरीकोज व्हेन्स या आजारावर एक मोफत शिबीर व कार्यशाळा घेण्यात आली. या शिबीरात नवी मुंबईतील ७० हुन अधिक नागरिकांनी भाग घेतला होता. वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत बोलताना वोक्हार्ट हॉस्पिटलचे वेरीकोज व्हेन्स तज्ज्ञ डॉ. विक्रम चव्हाण म्हणाले, “जास्त वेळ उभे राहण्याचे काम असलेला वर्ग म्हणजेच ट्रॅफीक पोलीस, सुरक्षा रक्षक, शिक्षक, फेरीवाले तसेच रोजगारावर काम करणारे हमाल अशा लोकांमध्ये वयाच्या चाळीशीमध्येच वेरीकोज व्हेन्सचा त्रास सुरु होतो. शहरी भागात मॉल संस्कृती वाढू लागली आहे व यामध्ये काम करणारे नोकरदार वर्ग कामाचा बराच वेळ उभे राहून घालवतात. याचबरोबर शॉपिंग करताना गाहकांनाही सलग ४ ते ५ तास उभे राहावे लागते. व्हेरिकोज म्हणजे विस्तारलेल्या, गुंतलेल्या किंवा गाठाळलेल्या आणि व्हेन्स म्हणजे हृदयाकडे अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या शिरा. या शिरांचे जाळे संपूर्ण शरीरभर पसरलेले असले तरी त्या विस्तारणे, गाठाळणे हे सहसा पायांच्या शिरांच्या बाबतीत घडते आणि यालाच “व्हेरिकोज व्हेन्स’ असे म्हणतात. या आजारामध्ये पायावरच्या शिरा अर्निबधपणे मोठय़ा होतात. अशुद्ध रक्त हृदयाकडे नेणाऱ्या झडपांमधल्या बिघाडामुळे किंवा पोटरीच्या स्नायूंच्या अकार्यक्षमतेमुळे ही समस्या उद्भवते. हे रक्त शिरेमध्ये साचते. त्यामुळे पायाला सूज येते. ठणका बसतो. रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याने घोटय़ाजवळ सूज येते. त्यावर योग्य वेळी उपचार करण्यात आले नाहीत तर रुग्णाला चालणेही त्रासदायक होते. पाय दुखतात म्हणून मी औषध घेतो असे सांगणाऱ्या रुग्णांना पहिली चार ते पाच वर्षे वेरीकोज व्हेन्स हा आजार झाला आहे हेच कळत नाही.”
भारतामध्ये सध्या व्हेरिकोज व्हेन्स या आजाराचे प्रमाण वाढत आहे. अनेक आघाडय़ांवर लढताना शरीर स्वास्थ्याकडे होणारे दुर्लक्ष हे याचे प्रमुख कारण आहे. लठ्ठपणा, अति घट्ट कपडे वापरणे, अनुवंशिकता, संततीनियमनाच्या गोळ्या, गर्भारावस्था यामुळे हा त्रास उद्भवू शकतो. भारतामध्ये सुमारे ४० टक्के महिला आणि २५ टक्के पुरुषांना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असल्याचं निदर्शनास आले आहे. हा त्रास शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. मात्र प्रामुख्याने पायांवर व्हेरिकोज व्हेन्सचा परिणाम होतो अशी माहिती वोक्हार्ट हॉस्पिटलनेे दिली.