मुंबई : अधिक प्रमाणातील पावसामुळे बाधित झालेल्या पुणे जिल्ह्यातील पुनर्वसित माळीण (ता. आंबेगाव) गावातील घरांचे सी.ओ.इ.पी.कडून स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्यात आले आहे. यामध्ये घरांचे कोणतेही नुकसान वा घरांना तडे जाण्याची घटना घडल्याचे आढळून आले नाही. काही ठिकाणी माती वाहून जाणे, रस्ता खचणे, ड्रेनेज व गटारीचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. झालेल्या नुकसानीच्या दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत. तसेच माळीण ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचे काम करण्यात आले आहे अशी माहिती पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
३० जुलै २०१४ रोजी मौजे माळीण या दुर्गम व आदिवासी गावात अतिवृष्टी होऊन गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५१ व्यक्ती दरडीखाली सापडून मृत्यमुखी पडल्या होत्या. दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्ती निवारण, प्रधानमंत्री सहाय्यता निधी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांतर्गत आर्थिक सहाय्य देण्यात आले.
चालू वर्षाच्या पावसाळ्यातील दिनांक २४ व २५ जून रोजी झालेल्या पहिल्या पावसाच्या पाण्यामुळे पुनर्वसीत गांवठाणामध्ये माती वाहून जाणे, काही ठिकाणी रस्ता खचणे, तसेच पावसामुळे गांवठाणामध्ये विद्युत पुरवठा खंडीत होणे आदी समस्या निर्माण झालेल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच तालुका स्तरावरील समिती मधील अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहचले. झालेल्या पावसामुळे गांवातील काही ठिकाणी रस्ता खचलेला, काही ठिकाणी ड्रेनेज व गटारीचे नुकसान झालेले, काही घरांच्या पायऱ्याखालील माती खचल्याचे निदर्शनास आले. याबाबत तातडीने संबंधित विभागाकडुन दुरुस्तीची कार्यवाही सुरु करण्यात आली. नवीन गांवातील घरांचे सी.ओ.इ.पी. कडुन स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्यात आले असून घरांचे कोणतेही नुकसान वा घरांना तडे जाण्याची घटना घडली नसुन काही घरांमध्ये ओलावा आल्याचे दिसुन आले. स्थानिक अधिका-यामार्फत तातडीने सर्व कार्यवाही सुरु करण्यात आली असुन सदर कामावर देखरेख ठेवण्यासाठी स्थानिक अधिकारी व ग्रामस्थांची समिती नेमण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने माळीण गावच्या पुनर्वसनाबाबत ग्रामस्थांसमवेत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त सचिव एम. व्ही. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व पाणी पुरवठागाचे कार्यकारी अभियंता, पी. एम. आर. डी. ए.चे कार्यकारी अभियंता पुणे, दक्षता व गुणनियंत्रण मंडळाचे कार्यकारी अभियंता, सी.ओ.ई.पी.चे श्री. बिराजदार , श्री. साकळकर क्रियेशन इंजिनिअरींग पुणे या सर्व बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींसमवेत संपुर्ण पुनर्वसित गावठाणाची पाहाणी केली. यावेळी माळीण ग्रामस्थांची बैठक घेऊन तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत नियोजन व कार्यवाही सुरु करण्यात आली व ग्रामस्थांच्या मनातील भीती दूर करण्याचे काम करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभाग व सी.ओ.ई.पी. यांच्या पहाणीनुसार नवीन गांवठाणातील घरांच्या लेआऊटला धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच रस्ते दुरुस्ती, ड्रेनेज दुरुस्ती, घराचे वॉटर प्रुफींग, गॅबीयन बंधारे आदी कामे प्रकल्पाच्या ठेकेदारांकडुन आवश्यक ती दुरुस्तीची कामे करुन घेण्यात येत आहेत. स्थानिक तहसिलदार, गटविकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना दर २ दिवसांनी माळीण गांवाला भेट देऊन परीस्थितीचा आढावा घेणे व आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. माळीण येथील भौगोलीक परिसराचा व हवामानाचा अभ्यास करता सुमारे ८०० ते ९०० मीमी. पाऊस होत असल्याने पुनर्वसित गांवाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पुढील 1वर्षासाठी या बांधकामाच्या दुरुस्ती व देखभालीच्या खर्चाची तरतुद कामाच्या अंदाजपत्रकामध्येच अंतर्भूत आहे. त्यामुळे नवीन निधीची आवश्यकता नाही. तसेच माळीण गावामध्ये तांत्रिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ते २४ तास गांवात राहणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त सचिव एम. व्ही. पाटील हे या दुर्घटनेनंतरच्या परीस्थितीबाबत, घरांचे बांधकाम, पायाभुत सुविधांची सद्य:स्थिति आदीबाबत करावयाच्या उपाययोजनाबाबत अहवाल देणार आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे