मुंबई, (निसार अली) : पालिकेने पाण्याच्या टाक्या बसवल्या खर्या परंतु, त्या कोरड्याच ठेवल्याने ऐन उन्हाळ्यात पुन्हा मालवणीतील गेट क्रमांक ८ च्या अम्बोजवाडी परिसरातील नागरिकांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिला वर्गाचे हाल होत आहेत. पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
अनेक वर्षांपासून या परिसरात पाणी टंचाईची समस्या आहे. पाणी आणण्यासाठी दोन ते तीन किमी. पर्यंत महिलांना चालत जावे लागत आहे. पाणी टंचाई सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाने अम्बोजवाडीत पाच हजार लीटरच्या अनेक टाक्या बसवल्या आहेत. मात्र वर्ष उलटूनही त्यात टँकरने पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे या टाक्या केवळ देखावा ठरल्या आहेत.
या ठिकाणी महिलावर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला येथील पाणीप्रश्न पालिकेने लवकरात लवकर सोडवावा, अन्यथा जनआंदोलन उभारू, असा इशारा सकल ओबीसी समाजाच्या शैलू एन.सी यांनी दिला आहे.