मालाड,ता.12(निसार अली) : मालाड पश्चिमेत दिनांक 12 मे रोजी 4 कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरू झाली. काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि काही संस्थांनी मालवणीसह मढ, मार्वे विभागात लसीकरण केंद्र सुरू करावे, अशा मागण्या केल्या होत्या. तसेच याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री, मुंबई महानगरपालिका आयुक्त व महापौर तसेच मालाड पश्चिमचे आमदार व पालकमंत्री अस्लम शेख यांना ही पत्र लिहिले होते. अखेर मालवणी प्रवेशद्वार क्रमांक 6, पालिका दवाखाना येथे नगरसेविका कमरजहाँ सिद्दीकी यांच्या हस्ते व नगरसेवक वीरेंद्र चौधरी यांच्या उपस्थितीत तसेच प्रवेशद्वार क्रमांक 8 खुशबू हॉल येथे तसेच मार्वे येथील रहेजा इमारतीतील पालिका दवाखाना आणि मढ दर्यामाता चर्च येथे लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. मढ येथील लसीकरण केंद्राचे उदघाटन शिवसेनेचे विभाग अध्यक्ष सुधाकर सुर्वे यांच्या हस्ते व पी उत्तर विभागीय प्रभाग समिती अध्यक्ष संगीता सुतार यांच्या उपस्थितीत झाले. किरण कोळी व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्र सेवा दल, प्रोग्रेसिव्ह मुस्लिम फ्रंट, सफल विकास वेलफेअर सोसायटी, समता युवक सभा व इतर संस्था संघटनांनी लसीकरण केंद्राची मागणी धरून ठेवली होती. कारण मढ, मार्वे तसेच मालवणी म्हाडा,आंबोजवाडी तील नागरिकांना 5 ते 11 किलोमीटरचा टप्पा गाठावा लागत होता.