मुंबई : ”वहिनीला आणायला चांदोबाची गाडी, चांदोबाच्या गाडीला हरणाची जोडी” हे लहानमुलांच्या गाण्यातले गदिमांचे शब्द असोत, किंवा बच्चे कंपनीच्या आवडत्या सांताक्लॉझला घेऊन येणारी हरणांची गाडी असो; हरणांची जोडी म्हणजे लहान मुलांच्याच नव्हे, तर मोठ्यांच्याही आनंदाला वाढविणारी जोडगोळी. हीच हरणांची जोडी आता नवीन वर्षाचे औचित्य साधून मालाड परिसरातल्या राजीव गांधी उद्यानात दाखल झाली आहे. या शोभेच्या हरणांसोबत ‘सेल्फी’ काढण्यासाठी लहानांसोबतच मोठ्यांचीही मोठी गर्दी होत असून शोभेच्या हरणांच्या प्रतिकृती लवकरच आणखी दोन उद्यानांची शोभा वाढविणार आहेत. यामध्ये शहर भागातील व पूर्व उपनगरातील प्रत्येकी एका उद्यानाचा समावेश आहे, अशी माहिती उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
महापालिका क्षेत्रातील विविध विरंगुळ्याच्या ठिकाणांची संख्या वाढावी आणि असलेली विरंगुळ्याची ठिकाणे अधिकाधिक आकर्षक व वैविध्यपूर्ण व्हावी, यासाठी महापालिका सातत्याने नियोजनबद्ध प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून मालाड पश्चिम परिसरातल्या आदर्श नगर व गोरसवाडीजवळ असणा-या’भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी उद्याना’त नवीन वर्षाचे औचित्य साधून हरणांच्या जोडीची शोभेच्या प्रतिकृती बसविण्यात आल्या आहेत. उद्यानाची शोभा वाढविणारी आणि लालसर व हिरव्या रंगाचे आकर्षक’एलईडी’ दिवे असणारी हरणांच्या जोडीची ही प्रतिकृती उद्यानातील शोभेच्या झाडांजवळ बसविण्यात आली आहे. संध्याकाळी दिवस मावळतीनंतर या हरणांच्या प्रतिकृतीतील विद्युत दिवे लावण्यात येत असून प्रकाशाने उजळलेल्या या हरणांसोबत ‘सेल्फी’ किंवा ‘फोटो’ काढण्यासाठी रात्री ९ पर्यंत नागरिकांची रीघ लागत आहे.