मुंबई, (निसार अली) : …बाजू पे ७८६ का है बिल्ला… हा कुली सिनेमातील अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध डायलॊग. या डायलॊगमुळे ७८६ हा मुस्लीम धर्मियांत विशेष महत्व असणारा क्रमांक सर्वधर्मियांनी आपला बनवला. कुली सिनेमात अमिताभ यांनी इक्बाल साकारला होता. इक्बाल च्या हाताच्या दंडावर ७८६ चा बिल्ला असतो. त्या काळी दिग्ददर्शकाने मोठ्या खुबीने पडद्यावर ७८६ या क्रमांकाचा वापर केला होता,. आता मालाड येथील ओरलेम येथे राहणार्या अख्तर पटेल या ४५ वर्षीय व्यक्तीने प्रत्यक्ष जीवनात ७८६ चा आधार घेत वेगळा प्रयोग केला. सामाजीक संदेश देण्यासाठी अख्तरने देशाचा नकाशा डोळ्यासमोर ठेवून इंग्रजी क्रमांक 786 येईल, असा मार्ग बनविला आणि गांधी जयंतीचे औचित्य साधून तो दुचाकीवरून प्रवासाला निघाला. २४ दिवसांत तब्बल ८८७६ किमीचा प्रवास पूर्ण करत त्याने 786 ही प्रवासाची रचना पूर्ण केली. त्यामुळे सध्या त्याचे मालाड भागात भरभरून कौतुक केले जात आहे.
विविधतेतच एकता आहे, हा संदर्भ समाज मनात रुजविण्याचा मोहिमेवर अख्तर दुचाकीवरून प्रवास करत निघाला. त्यासाठी त्याने भारतातील सात विविध राज्यातील शहरे आणि गावागावांतून प्रवास केला. 3 ऑक्टोबर रोजी गुजरात येथील अहमदाबाद येथून गुजरात ते मध्यप्रदेश इंदोर, महाराष्ट्र-अहमदनगर, गोवा-पणजी,कर्नाटकात-बेळगाव, परत महाराष्ट्र ते तेलंगणहून मध्य प्रदेश, परत महाराष्ट्र, कर्नाटक ते आंध्रप्रदेश होत कर्नाटक बेळगाव येथे 786 च्या वळणाचा प्रवास त्याने पूर्ण केला.
दुचाकीवरून विविध राज्यांमध्ये त्याने प्रवास करत ही मोहीम पूर्ण केली. बुधवार २५ ऑक्टोबर रोजी तो मुंबईतील मालाड येथील आपल्या घरी संध्याकाळी ५ वाजता परतला. ही मोहीम फत्ते झाल्याबद्द्ल त्याने समाधान व्यक्त केले.
तेलंगण राज्यातील वाहतूक पोलिसांनी त्याला खूप मदत केली. नागरिकांनी जागोजागी त्याचे स्वागत केले. प्रवासात तो आजारिही पडला, तरिही ध्येय गाठण्यासाठी जिद्दीने त्याने पुढचा प्रवास सुरु ठेवला. घाटमाथ्यावरील रस्ते, ऊन-पाऊस-थंडी यांचा सामना करत अपेक्षीत ध्येय त्याने गाठले. दीड वर्षांपासून अख्तरने या मोहिमेचा अभ्यास केला. जीपीएस या तंत्रज्ञानाचीही मदत त्याने घेतली. स्वत:च्या खिशातील सुमारे दीड लाख रुपये त्याने त्यासाठी खर्च केले. मोहिमेसाठी त्याला पत्नी दीविना, मुलगा आयान, मुलगी नरीसाव अलिना यांचा पाठिंबा मिळाला. यापुढे ख्रिस्ती धर्मियांचा क्रॉस, हिंदु धर्मातील ओम ची रचना नकाशावर करत प्रवास करण्याचा निर्धार अख्तरने केला आहे.