सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील माकड तापाच्या साथीबाबत शीघ्र कृती दलाची स्थापना करण्याची सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. माकड तापाच्या साथीबाबत प्रादूर्भाव झालेल्या गावात केल्या जात असलेल्या उपाययोजना बाबत सविस्तर आढावा आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, उपवनसंरक्षक श्री. रमेश कुमार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मोमीन आदी उपस्थित होते.
माकड तापाच्या साथी बाबत वन विभाग, आरोग्य विभाग व पशुसंवर्धन विभागाने संयुक्तरित्या व समन्वयाने कार्यवाही करावी अशी सूचना करुन जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले की, शीघ्र कृती दलाने घटनास्थळी दोन तासात पोहचणे आवश्यक आहे. घटनास्थळी गेल्या नंतर मृत माकडाची विल्हेवाट लावणे, परिसरात मेलॅथिऑन पावडरची फवारणी करणे या गोष्टी त्वरीतपार पाडाव्यात. आरोग्य विभागाने तापाचे सर्वेक्षण, नमुने गोळा करुन तपासणीसाठी पाठविण्याची कार्यवाही त्वरीत करावी.
माकडतापाच्या रोगाबाबत जनतेत जाणिव जागृती व्हावी या साठी भित्तीपत्रिका,हॅण्डबील तयार करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी या बैठकीत केली. या नुसार आरोग्य विभागामार्फत भित्तीपत्रिका व हॅण्डबील छपाई करुन दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील या साथरोगाच्या प्रभावित गावात वितरण करण्याचे ठरले.
डीएमपी ऑईलच्या 2500 बाटल्यांचे वितरण
माकड तापाचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून आतापर्यंत 2 हजार 500 डीएमपी ऑईलच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले आहे. बाधीत गावे तसेच परिसरातील 2 हजार 700 लोकांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी यावेळी दिली.
भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत केंद्रे व घोडगे, तळकट- कुडासे, कुंब्रल,कोलझर व तळकट, बांदा- सटमटवाडी व दोडामार्ग तालुक्यातील बांबर्डे या गावातील बाधीत क्षेत्रात घरोघरी डीएमपी ऑईल बाटल्यांचे वितरण, पावडर फवारणी केली आहे. आतापर्यंत 13 रुग्ण आढळले. या सर्व रुग्णांना औषधोपचार करुन डिसचार्ज दिला आहे. माकड तापाच्या रुग्णांचे तसेच इतरांचे रक्त नमुने कर्नाटकातील मणिपाल व्हॉयरॉलॉजिकल सेंटर मधून मोफत तपासले जातात. यंदाच्या वर्षी 135 तर गतवर्षी 850 रक्त नमुने तपासले असल्याची माहितीही डॉ. साळे यांनी या बैठकीत दिली. बैठकीत डॉ. तुषार चिपळूणकर, पशुसंवर्धन विभागाचे श्री. देसाई व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.